पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६


मात । केलें वाताहात उचित काळे ॥ ३ ॥ तुका ह्मणे करी
जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मळ स्तुति होतां ॥ ४ ॥

  ६१. जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें
वेच करी ॥ १ ॥ उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम
भोगील जीव खाणी ॥ २ ॥ परउपकारी नेणें परनिंदा ।
परस्त्रिया सदा बहिणी माया ॥ ३ ॥ भूतदया गाईपशुंचे
पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥ ४ ॥ शांतिरूपे नव्हे
कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचे ॥ ५ ॥ तुका
ह्मणे हेंचि आश्नमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ॥ ६ ॥

  ६२. निवडे जेवण शेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें
सकळही ॥ १ ॥ न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली
खटपट जाय वांयां ॥ २ ॥ संपादिलें व्हावें धरिलें तें सोंग ।
विटंबना व्यंग पडिलिया ॥ ३ ॥ तुका ह्मणे वर्म नेणतां
जो रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥ ४ ॥

  ६३. यासी कोणी ह्मणे निंदेची उत्तरें । नागवला खरे
तोचि एक ॥ १ ॥ आड वाटे जातां लावी नीट सोई ।
धर्मनीत तेही ऐसी आहे ॥ २ ॥ नाइकतां सुखें करावें
ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥ ३ ॥ जन्म व्याधि
फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥ ४ ॥
तुका ह्मणे लिंब दिलियावांचून । अंतरींचा सीण कैसा
जाय ॥ ५ ॥

  ६४. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे
विटाळा अग्नि जैसा ॥ १ ॥ सत्यवादी करी संसार सकळ ।
अलिप्त कमळ जळीं जैसे ॥ २ ॥ घडे ज्या उपकार