पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०


पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका ह्मणे तो
परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णू त्याची ॥ ४ ॥

  ३६. इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहे ॥ १ ॥
धन्य आह्मी जन्मा आलों । दास विठोबाचे झालों ॥ २ ॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥ ३ ॥
तुका ह्मणे पाठवणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥ ४ ॥

  ३७. ओले मातीचा भरंवसा । कां रे धरिशी मानसा
॥ १ ॥ डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरक्या जाले ॥ २ ॥
नाक सरळ चांगलें । येउन हनुवटी लागलें ॥ ३ ॥ तुका
ह्मणे आलें नाहीं । तंव हरिला भजरे कांहीं ॥ ४ ॥

  ३८. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान । विलास मिष्टान्न
करूनियां ॥ १ ॥ शरीर रक्षावे हा धर्म बोलती । काय
असे हातीं तयाचिया ॥ ३ ।। क्षणभंगुर हो जाय न कळतां ।
ग्रास गिळो सत्ता नाहीं हातीं ॥ ३ ॥ कर्वतिलीं देहें
कापियेलें मांस । गेले वनवासास शुकादिक ॥ ४ ॥ तुका ह्मणे
राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥ ५ ॥

  ३९. देहबुद्धि वसे जयाचिये अंगीं । पूज्यता ते जगीं
सुख मानी ॥ १ ॥ थोर असे दगा झाला त्यासी हाटीं ।
सोडोनियां गांठी चोरी नेली ॥ २ ॥ गांठीचे जाऊनि
नव्हे तो मोकळा । *बांधिलासे गळा दंभलोभे ॥ ३ ॥
पुढिल्या उदिमा झालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी
॥ ४ ॥ तुका ह्मणे ऐसें बोलतील संत । जाणूनियां घात
कोण करी ॥ ५ ॥

_________________________________________


१ शरीर. २ मकरध्वज, शिबी ह्यांनी शरीरे देऊन आपली

नावें अमर केलीं. (* बांधविला.)