पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




१३. पोट.

  ३२. पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोशीं ॥ १ ॥
पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ २ ॥ जप
तप अनुष्ठान । पोटासाठीं जाले दीन ॥ ३ ॥ पोटें सांडियेली
चवी । नीचापुढे ते नाचवी ॥ ४ ॥ पोट काशियाने भरे ।
तुका ह्मणे झुरझुरूं मरे ॥ ५ ॥

  ३३. वितीयेवढेसे पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥
जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥२॥ अभिमाना
सिरी भार । झाले खर तृष्णेचे ॥ ३ ॥ तुका ह्मणे नरका
जावें । हाचि जीवें व्यापार ॥ ४ ॥

  ३४. निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवीं बोभाट
॥ १ ॥ जटा राख विटंबना। धीर नाहीं क्षमा मना ॥ २ ॥
शृंगारिलें मडें । जीवेंवीण जैसे कुडें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
रागें । भलतें चावळे वाउगें ॥ ४ ॥

____
१४.शरीर.

  ३५. सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार
आशा समूळ । निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ
स्फटिक जैसा ।। १ ।। मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी ।
येती तयापासीं अवघीं जने । तीर्थांसी तीर्थ जाला तोचि
एक । मोक्ष तेणें दर्शने ॥ २ ॥ मन शुद्ध तया काय
करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥ हरिच्या गुणें
गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥ तन मन धन दिले

_____________________________________

१. पोटाचे कोड न पुरवितां त्याच्या इच्छा मारल्या पाहिजेत.