पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अवसानीं शुद्धाशुद्ध ।।२।। त्याग नांव तरी निर्विषयवासना ।
कार्यकारणापुरते विधि ॥ ३ ॥ तुका ह्मणे राहे चिंतनी
आवडी । येणे नांवें जोडी सत्यत्वेंशीं ॥ ४ ॥

  २९. निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हेंचि एक
॥ १ ॥ तरीच करील अंगीकार नारायण । बडबड तो सीण
येणेंविण ॥ २ ॥ सोइरें पिशुन समानचि घडे । चित्त पर
ओढे उपकारीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे चित्त जालिया निर्मळ ।
तरिच सकळ केलें होय ॥ ४ ॥

_____
१२.लाज.

  ३०. देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका
थारा देऊ कोणी ॥ १ ॥ मोडिले या रांडे सुपंथ मारग ।
चालविलें जग यमपंथें ॥ २ ॥ परिचारी केली आपुलीच रूढी ।
पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे आणा
राउळा धरून । फजित करून सोडू मग ॥ ४ ॥

  ३१. आतां येथे लाजे नाहीं तुझे काम । जाय मज
राम आठवू दे ॥ १ ॥ तुझे भिडे माझे बहु जाले घात ।
केलों या अंकित दुर्जनाचा ॥ २ ॥ माझें केलें मज पारिखें
माहेर । नटोनी साचार चाळविलें ॥ ३ ॥ सुखासाठी एक
वाहियेलें खांदीं । तेणें बहु मांदी मेळविली ॥ ४ ॥ केला
चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा
॥५॥ तुका ह्मणे आतां घेईन कांटीवरी । धनी म्यां कैवारी
केला देव ॥ ६ ॥

_____

________________________________________


१. परिचारी - दासी. २. मांदी - समुदाय.