पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  १५. लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ १ ॥
ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ।। २ ।। ज्याचे
अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥ ३ ॥ तुका ह्मणे
जाण । व्हावे लहानाहुनि लहान ॥ ४ ॥

  १६. नीचपण* बरवे देवा । न चले कोणाचाही हेवा
॥ १ ॥ महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती ॥ २ ॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरी ॥ ३ ॥ तुका
ह्मणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥ ४ ॥

______
७.दया.

  १७. दया तिचे नांव भूतांचे पाळण । अणिक
निर्दळण कंटकांचे ॥ १ ॥ पाप त्याचे नांव न विचारीतां नीत
भलतेंचि उन्मत्त करी सदा ॥ २ ॥ धर्म नीतीचा हा ऐक
वेव्हार । निवडिलें सार असार तें ॥ ३ ॥ तुका ह्मणे धर्म
रक्षावयासाठीं । देवासही आटी जन्म घेणे ॥ ४ ॥

  १८. देवाची पूजा हे भूतांचे पाळण । मत्सर तो सीण
बहुतांचा ।। १ ।। रुसावें फुगावें आपुलियावरी । उरला तो
हरी सकळही ॥ २ ॥ तुका ह्मणे संतपण याचि नांवें ।
जरि होय जीव सकळांचा ॥ ३ ॥

  १९. उपकारासाठी बोलों हे उपाय । येणेंविण काय
चाड आह्मां ॥ १ ॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो
कळवळा ह्मणउनि ॥ २ ॥ तुका ह्मणे माझे देखतील डोळे ।
भोग देतेवेळे येईल कळों ॥ ३ ॥

___________________________________________

( * निचपण )