पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अगें अळंकार । संतोषा ये फार देखोनियां ॥ ४ ॥ तुका ह्मणे
स्तुति योग्य नाहीं परी । तुह्मां लाज थोरी किताची ॥ ५ ॥

_____


२.आईबापाची योग्यता.

  ५. मायबापे केवळ काशी । तेणें न वजावें तीर्थासी
॥ १ ॥ पुंडलीके काय केलें । परब्रह्म उभे ठेलें ॥ २ ॥ तैसा
होई सावधान । हृदयीं धरी नारायण ॥ ३ ॥ तुका ह्मणे
मायबापे । अवधीं देवाचीं स्वरूपें ॥ ४ ॥

_____
३.गुरु.

  ६. सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधीं
त्याचे ॥ १ ॥ आपणासारिखे करिती तात्काळ । कांहीं
काळवेळ नलगे त्याशीं ॥ २ ॥ लोह परिसासी न साहे
उपमा । सद्गुरु-महिमा अगाधची ॥ ३ ॥ तुका ह्मणे ऐसे
आंधळे हे जन । गेले विसरून खऱ्या देवा ॥ ४ ॥


______
४.अभ्यास.

  ७. ओलें मूळ भेदी खडक चे अंग | अभ्यासासी सांग
कार्यसिद्धि ॥ १ ॥ नव्हे ऐसे काहीं नाहीं अवघड । नाहीं
कईवाड तोंच वरि ॥ २ ॥ दोरें चिरा कापे पडिला कांचणीं।
अभ्यासे सेवनीं विष पडे ॥ ३ ॥ तुका ह्मणे कैंचा बसण्यासी
ठाव । जठरी बाळा वाव एकाएकीं ॥ ४ ॥


१. खऱ्या देवा - गुरु हाच देव ह्यास.
२. दोरे चिरा कापे - दोरांनी दगड कापले जातात.
३. आईच्या पोटांत मूल हळूहळू वाढते त्याला तेथे एकदम
 बसण्यास स्थळ मिळत नाहीं.