पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१. मातृप्रेम.

  १. लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ।।१।।
उभयतां आवडी लाडे । कोडे कोड पुरतसे ॥२॥ मेळवितां
अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥३॥ तुका ह्मणे जड भारी ।
अवघे शिरीं जननीचे ॥ ४ ॥

  २. पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय
दुःख ॥१॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी
प्रीती हितासाठीं ॥२॥ खेळतां विसरे भूक तान घर ।
धरूनियां कर आणी बळे ॥३॥ तुका ह्मणे पाळी तोंडींचिया
घांसें । उदार सर्वस्वे सर्व काळ ॥ ४ ॥

  ३. नलगे मायेसी बाळे निरवावें । आपुल्या स्वभावें
ओढे त्यासी ॥ १ ॥ मज कां लागला करणे विचार । ज्याचा
जार भार त्याचे माथां ॥ २ ॥ गोड धड त्यासी ठेवी न
मागतां । समाधान खातां नेदी मना ॥ ३ ॥ खेळतां गुंतलें
उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळे ॥ ४ ॥
त्याच्या दुःखेपणे आपण खापरी । लाही तळीं वरी होय
जैसी ॥ ५ ॥ तुका ह्मणे देह विसरे आपुला । आघात तो
त्याला लागों नेदी ॥ ६ ॥

  ४. काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं
लळा पाळीत ते ॥ १ ॥ काय नाही त्याची करीत ते सेवा ।
काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ २ ॥ अमंगळपणे कांटाळा न
धरी । उचलोनि करीं कंठी लावी ॥ ३ ॥ लेववी आपुलें

_______________________________________________

 १. निरवावे - सांभाळावे ( हाते ).
२. खापरी - खापराच्या परळीत भाजतांना लाह्या जशा
उडतात त्याप्रमाणे, तिचे काळीज दुःखाने उडते.