पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२

स्वकर्तव्य योग्यप्रकारे करून धर्माचरण करण्याविषयी उपदेश केला
त्या उपदेशाचा महाराजांवर उत्तम परिणाम होऊन ते पूर्ववत्
राज्यशकट हाकू लागले. लोहगांवीं शिवाजी कासार नामक
एक महा दुर्जन व कृपण मनुष्य होता. तो कीर्तनास येत तर
नसेच, परंतु तुकारामाची निंदा मात्र करी. एकदां खास तुकारामाने
त्यास बोलावणे केल्यावरून तो कीर्तनास गेला. बुवांचें तें हृदयंगम
कीर्तन ऐकून त्याचे मन द्रवले. पुढे तो दररोज कीर्तनास जाऊं
लागला व तुकारामाचा शिष्य झाला. वृत्तींत पालट पडल्यामुळे या
कृपणाने पुढे दान धर्मात आपली संपत्ति खर्च केली.

 (निर्वाण) साधुवर्य तुकाराम महाराजांची कीर्ति सर्वत्र पसरली.
त्यांच्या भजनीं अनेक लोक लागले. उपदेश श्रवणार्थ देहूस दर
रोज यात्रा जमू लागली. तुकारामाविषयीं स्तुतिघोष दुमदुमूं
लागले. हे तुकारामास आवडेना. 'या महत्वाच्या भाराने मी
वाहवला जात आहे, देवा मला संभाळ' असे त्यांनी ह्मटले आहे.
पूर्वीचा साधेपणा आता राहिला नव्हता. शिवाजी महाराजांसारखे
मोठमोठे लोक त्याच्या चरणीं मिलिंदायमान झाले होते. मला या
लौकिकांत व्यर्थ पाडलेंस, असे ते देवास वारंवार ह्मणत. एके
दिवशी सकाळी ते इंद्रायणीतिरी भजनास गेले आणि भजन चालू
असतांना शिष्यांदेखत नाहींसे झाले. त्यांना सुद्धा त्यांचा पत्ता
लागला नाही. यावेळी त्यांचे वय ४२ वर्षांचे होते. ते सदेह
वैकुंठास गेले, असे भाविक लोकांचे ठाम मत आहे.

 (उपसंहार) तुकारामाच्या अंगीं दया, क्षमा, शांति, विरक्ती,
निरपेक्ष बुद्धि, शुद्धाचरण, अलौकिक धैर्य इत्यादि अनेक सदगुण
वास करीत असल्यामुळे लोकांत त्यांचे तेज पडले. लोकांमध्ये त्यांनी
भगवद्भक्ति उत्पन्न केली. श्री पांडुरंगावर त्यांची एकविध निःसीम
भक्ति होती. आपण हीन पामर, आपली योग्यता ती काय, परंतु
पांडुरंग आपणास वदवितो. हा त्याचा आपणास संदेश आहे.
जड जीव उद्धरण्याकरितां या अभंगनौका आहेत. ईश्वर प्राप्तीची
हीच भरंवशाची वाट आहे, अशी त्यांची खात्री होती.

____