पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११

बंदोबस्त झालाच पाहिजे. दादाजीने तुकारामास बोलावणे
पाठविलें. तुकाराम आपल्या १४ शिष्यांसह तेथे गेले. त्या दिवशी
पुण्यांत तुकाराम बुवांचे कीर्तन मोठ्या थाटाने व अत्यंत भक्तिप्रचुर
वाणीने झाले. सर्व लोक भक्तिप्रेमांत तन्मय झाले. तो संन्यासी
जरी विकारवश व हट्टी होता तरी त्याचे हृदय द्रवले. तुकारामाच्या
ह्मणण्याची सत्यता त्याने कबूल केली! साधूचा नाहक छळ केला
म्हणून दादोजीने त्याची गाढवावर धिंड काढण्याविषयी हुकूम
फर्माविला. परंतु तुकारामाच्या मध्यस्तीमुळे त्याला तो हुकूम
रद्द करावा लागला.

 (चरित्रांतील काही गोष्टी) तुकारामांची ख्याति ऐकून
शिवाजी महाराजांनी त्यांजकडे कारकून, घोडे, छत्री, अबदागिरी
वगैरे लवाजमा पाठवून त्यांना आपल्या घरी येण्याविषयी विनंति
केली. 'आम्हा हरिदासांना या लवाजम्याचे व या भेटीचे प्रयोजन
नाहीं. तुह्मी परत जा आणि आमचे शिवाजी राजाला पत्र द्या.
असे निक्षुण सांगून त्यांनी महाराजांना पत्र दिले. त्यात त्यांनी
महाराजांचा गौरव करून सांगितले की, 'सद्गुरु रामदासावर
एकविध श्रद्धा ठेवा. सर्वांभूतीं ईश्वर आहे, हा भाव मनांत ठेवून
अनाथांची दया करा. आह्मांस भिक्षा थोर आहे. आकाश हे
पांघरूण व भूमीचे अंथरूण ही आम्हाला पुरेशी आहेत. आह्मांस
तुम्हापाशी कांहीं मागावयाचें नाहीं.' हे निस्पृहतेचे पत्र पाहून
तुकारामांविषयी महाराजांची श्रद्धा दुणावली. ते तुकारामाच्या
भेटीस गेले. नमस्कार करून रत्नांनी भरलेले ताट त्यांनी
तुकारामापुढे ठेविलें. स्वामींनी ती रत्ने ब्राह्मणांना वांटून दिली.
शिवाजीची तुकारामावर विशेष भक्ति जडली. एकदा त्यांना वैराग्य
उत्पन्न होऊन त्यांनी राज्य चालविण्याचे नाकारिले. तेव्हां त्यांची
आई जिजाबाई त्यांना शरण गेली व ह्मणाली 'माझ्या एकुलत्या
एका मुलाला जी उपरति झाली आहे ती योग्य नसून तो
पूर्वीप्रमाणे राज्य चालवील असे करा. तेव्हां स्वामींनी त्यांना आपले