पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०


रौरव नरकांत घालीत आहेस. करितां अभंग करणे व कीर्तन करणे
सोडून दे.' तुकारास म्हणाले 'बरे आहे, परंतु आजपर्यंत मी जे
अभंग रचले आहेत, त्यांची वाट काय ?' भट्ट ह्मणले 'ते बुडवून
टाक.' घरी येऊन तुकारामबुवांनी अभंगांच्या वह्या फडक्यांत
गुंडाळल्या आणि दगड बांधून त्या इंद्रायणीच्या डोहांत टाकल्या.
त्यावेळी त्यांना अतिशय दुःख झाले! त्यांच्या डोळ्यांतून
अश्रुधारा चालल्या ! त्यांनी तेथेंच १३ दिवस धरणे घेतले आणि
पांडुरंगाचा धांवा चालविला. हे शोकपर वीस अभंग आहेत.
चवदाव्या दिवशी वह्या पाण्यावर तरंगू लागल्या ! हा साक्षात्कार
पाहून सर्व आश्चर्यचकित झालें ! यामुळे तुकारामबुवांची कीर्ति
अधिकच पसरली.

 इकडे पुण्यास नागनाथाचे दर्शनास रामेश्वर भट्ट गेले असतां
तेथे जवळच अनघडशा फकिराची बाग होती. तेथील विहिरींत
रामेश्वर भट्टानें स्नान केले. तेव्हापासून त्याच्या अंगाचा दाह होऊ
लागला. तो काहींकेल्या शमेना. तेव्हां तो आळंदीस जाऊन
ज्ञानेश्वराची आराधना करू लागला. तेथे त्याला तुकारामबुवाकडे जा,
असा दृष्टांत झाला. इकडे तुकारामबुवांच्या वया पाण्यावर निघाल्या,
हे वृत्त त्याच्या कानी आल्यावर तो पश्चात्तापाने व लज्जने शरमला !
त्याने तुकाराम महाराजांचे पाय धरले. तेव्हा त्यांनी त्याला
चित्तशुद्धीविषयों ( अभंग ८o ) उपदेश केला तो ऐकून त्याचा दाह
शांत झाला. पुढे हाच रामेश्वरभट्ट तुकारामाचा शिष्य झाला.
याचप्रमाणे तुकारामाची भक्ति व वैराग्य पाहून कोंडभट्ट पुराणिक
नामक एक विद्वान् ब्राह्मण त्याचा शिष्य झाला.
 एकदां तुकाराम बुवांनी लोहगांवीं नाममहिमा वर्णन करून
यज्ञयाग, जपतपादि अनेक खटाटोपांचे ह्यापुढे तेज नाही, असा
उपदेश केला. तो ऐकून एक संन्यासी क्रोधाविष्ट होऊन पुण्याचा
मोकाशी दादोजी कोंडदेव याजकडे गेला आणि फिर्याद केली
कीं, तुकाराम हा वैदिक धर्माचा उच्छेद करीत आहे. त्याचा