पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तुकारामाचा पहिला धडा होय. कोणी आजारी असल्यास त्याची
सुश्रुषा करावी, कोणास कांहीं लागल्यास आणून द्यावे. कोणा
प्रवाशास स्नानास ऊन पाणी तर कोणाचे पाय चेंपणे. कोणाचे
ओझे नेणें तर कोणाचे आडलें काम करणे. कथा-कीर्तनांत दिवे
लावणें, बसणे घालणें, धृपद धरणें ही कामें तो करी. हे काम
हलके आहे, ते काम आपल्या योग्यतेंचे नाहीं, लोक आपणास
हांसतील, आपली निंदा करतील, ह्याचा विचारच त्यानें सोडून
दिला होता. ही परोपकारवृत्ति इतकी वाढली की, घरांत पोटास
मिळण्याची भ्रांत असतांना त्याने भिक्षेकऱ्यास दाणे घालावे. उघड्यांना
अंगावरची किंवा घरांतील वस्त्रे द्यावी. गयावया करून कोणीं
कांहीं जिन्नस उधार मागितला तर त्याला तो मिळावयाचाच. पैसे
कमी दिले तरी हरकत नाहीं. न दिले तरी मागणें नाहीं. माझ्या
मुलांमुलींची लग्ने व्हावयाची आहेत, असे कोणी सांगितले की,
स्वारीने विक्रीचे किंवा भांडवलांतून पैसे दिलेच. स्वतःचे भांडवल
घालवून तुकाराम फार हालाखीत आला असतांना जिजाबाईने
दोनशे रुपये कर्ज काढून पतीला व्यापारास भांडवल दिले. ते
मीठ घेऊन देशावर गेले. लहर लागली ह्मणजे भजन व लहर
लागेल तेथे मुक्काम. यामुळे बरोबरची मंडळी ह्यांना कंटाळली.
या व्यापारांत त्यांना सुदैवाने दोन पैसे मिळाले. परंतु घरी येत
असतांना शिपायांच्या ताब्यात असलेला कोणी कैदी त्यांना वाटेत
भेटला. तो ह्मणाला “कर्जामुळे मी कैदेत पडलों असून माझी
शेतवाडी जप्त केली आहे. माझी मुलेबाळे मरत आहेत. कृपा
करून मला सोडवा." झाले. तुकारामाने सर्व पैसे त्याला देऊन
टाकले. घरी आल्यावर जिजाबाईने यथेच्छ वाक्ताडण केलें !
घरची ही स्थिति. लोकांनी तर त्याला मूर्खातच काढलें. नीच
लोक त्याची वाटेल तशी विटंबना करू लागले. पैसा मिळवितां
येत नाही, ह्मणून हे भक्तीचे ढोंग करतो, असें ह्मणू लागले.
पैसा मिळविनासा झाल्यामुळे घरच्या मंडळीसही तो

आवडेनासा झाला.