पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 तुकाराम मोठ्या सचोटीने आपला धंदा करू लागला.
त्याच्या अंगीं लीनता व परोपकार बुद्धि हे गुण विशेष होते.
त्याचे वर्तन शुद्ध व बोलण्यांत खरेपणा असल्यामुळे तो विशेष
मान्यता पावला. त्याची गिऱ्हाइकी वाढली. त्याच्या पहिल्या
बायकोचे नांव रुखमाई. तिला दम्याची व्यथा असल्यामुळे
बोल्होबाने तुकारामाचे दुसरें लग्न पुण्यातील सावकार अप्पाजी गुळवे
ह्यांच्या मुलीशी केले. तिचे नांव जिजाबाई. याप्रमाणे तुकाराम
संसार करू लागल्यावर त्याच्या वयाच्या १७ व्या वर्षी त्याच्या
आईबापांचा काळ झाला. या दुःखाची तुकारामास विस्मृति
पडते न पडते तोंच, त्याचा वडील भाऊ सावजी ह्याची बायको
निवर्तली आणि तो गोसावी बनून तीर्थयात्रेस निघून गेला.
यामुळे तुकारामाचे मन अगदी खिन्न झाले. घरीं कुटुंब मोठे असून
सर्व भार त्याजवर पडला. कोणाचाच आधार राहिला नाहीं.

 (उपरती) याप्रमाणे तुकाराम विवंचनेत पडला असतांना
भयंकर दुष्काळ पडला. धारण शेराची झाली. ढोरें मेलीं. व्यापार
बसला. लोकांकडे थकलेले पैसे वसूल होईनात. अशा हालाखीत
तो असतांना त्याची पहिली बायको अन्नान करून मेली. तिचा
एकुलता एक व तुकारामाचा आवडता मुलगा संताजी हाही
अन्नावांचून मरण पावला. जिजाबाई ही तापट स्वभावाची स्त्री
असल्यामुळे तिचे वाक्प्रहार वारंवार होऊ लागले. तिच्या कित्येक
कठोर भाषणांचा उल्लेख तुकारामाने आपल्या अभंगांत केला आहे.
यामुळे भजन पूजनाकडे विशेष लक्ष लागून संसारतापांत पोळलेले
त्याचे मन तिकडेच विशेष रमू लागले, त्याला विरक्ति उत्पन्न
झाली. या झुट पसाच्यांत आपणास सौख्य मिळणे नाही, अशी
त्यांची खात्री झाली. पूर्वीप्रमाणे मन घालून तो व्यवसाय
करीनासा झाला. यामुळे आतबट्याचा व्यापार होऊ लागला.

 (परोपकारवृत्ति)नित्य भजन व संसारांत उदासीन इत्ति
यांना परोपकार वृत्तीची विशेष भर मिळाली, परोपकार हा