पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



{{|rh||तुकाराम महाराजांचे संक्षिप्त चरित्र||}}

 (कुलवृत्त) पुण्यापासून आठ कोसांवर इंद्रायणी नदीच्या तिरी
देहू गांव आहे. त्या गांवीं तुकारामाचे पूर्वज राहत असत.
पंढरीची वारी व नित्य भजन हा त्यांचा परंपरागत कुलाचारच.
यांचे पूर्वज सातवे पुरुष विश्वंभर बुवा हे पांडुरंगाचे येवढे निःसीम
भक्त होते की, ते दर एकादशीस पंढरीची वारी करीत असत.
पुढे त्यांना साक्षात्कार होऊन त्यांनी देहूस श्री पांडुरंगाचे देवालय
बांधले. तुकारामाचे वडील बोल्होबा हे किराणा विक्रीचा धंदा
करीत. पंढरीची वारी व नित्य भजन हा त्यांचा क्रम अबाधित
चालू होता. तुकारामाची आई कनकाई ही महान् साध्वी स्त्री असून
नवऱ्याप्रमाणें परम भगवद्भक्त होती. त्यांना पुष्कळ वर्षे संतती न
झाल्यामुळे ती उभयतां उद्विग्न असत. ईश्वरकृपेने पुढे त्यांना सावजी,
तुकाराम आणि कान्होबा असे तीन मुलगे झाले.

 (बालपण) तुकारामांच्या जन्म तिथीचा नक्की शोध लागत
नाहीं. तरी त्यांचा जन्म शके १५३०-३१ ( सन १६०८-०९ )
साली झाला असावा, असे अनुमान आहे. त्यांच्या बालपणाचीही
विशेष हकिगत उपलब्ध नाहीं. तरी पण उनाड, खेळाडू
आईबापांचे न ऐकतां स्वैर वागणारा असा तुकाराम खास नव्हता.
'मुळीं बाप होता ज्ञानी । तरी आम्ही लागलों ध्यानी' असे
त्यांनी एके ठिकाणी ह्मटले आहे. त्यावरून बालवयांत बापाबरोबर
भजन करण्याचा यांना सहवास असून ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ
इत्यादि कवींच्या कांहीं कविता यांना मुखोद्गत झाल्या होत्या.
बालपणापासूनच यांना भक्तीचे बाळकडू मिळाले होते. यांच्यापुढे
यांच्या आईबापांचा अनुकरणीय कित्ता होता. सावजी हा
उदासीन वृत्तीचा असून संसारांत तो फारसे लक्ष घालीत नसे.
तुकाराम संसारांतील कामे मोठ्या उत्सुकतेने व दक्षतेने करू

लागल्यामुळे बोल्होबास तो फार आवडू लागला.