पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८१

॥ २ ॥ बहु जालों खेदक्षीण । येणे शीण तो नासे ॥ ३ ॥
तुका ह्मणे गंगे वास । बहु त्या आस स्थळाची ॥ ४ ॥

  ३३८. पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें
पति ध्यानीं मनीं ॥ १ ॥ तैसे माझे मन एकविध जालें ।
नावडे विठ्ठलेविण दुजें ॥ २ ॥ सूर्यविकासिनी नेघे
चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
बाळ मातेपुढे नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥ ४ ॥

  ३३९. धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो
सर्वभावें ॥ १ ॥ चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट
पाहे कंठीं प्राण मेघा ॥ २ ॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रामृत ।
वाट पाहे अस्तउदयाची ॥ ३ ॥ धेनु येऊ नेदी जवळी
आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥ ४ ॥

३६. स्वतांविषयीं.

  ३४०. संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां
गव्हारे जाणावें हें ॥ १ ॥ विठ्ठलाचे नाम घेतां नये शुद्ध ।
तेथे मज बोध काय कळे ॥ २ ॥ करितों कवतुक बोबड्यो
उत्तरीं । झणीं मजवरी कोप धरा ॥ ३ ॥ काय माझी याति
नेणां हा विचार । काय मी ते फार बोलों नेणें ॥ ४ ॥ तुका
ह्मणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्म भाव तोचि जाणे ॥ ५ ॥

  ३४१. हीन माझी याती । वरि स्तुती केली संती
॥ १ ॥ अंगीं वसू पाहे गर्व । माझे हरावया सर्व ॥ २ ॥
मी एक जाणता । ऐसे वाटतसे चित्ता ॥ ३ ॥ राख राख
गेलों वांयां । तुका ह्मणे पंढरीराया ॥ ४ ॥

______________________________________

१ अत्त पश्चात्तापयुक्त.