पान:तुकारामबोवा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री सरस्वती मंदिर.

काव्यांचें हेंच विशिष्ट लक्षण आहे. आत्मानुभव, स्वतःच्या अंत:करणांतील कळकळ, मनांत निरंतर वसणारें भूतमात्रा- विषयीं प्रेम, अनावर, निर्मळ व अस्खलित भगवद्भक्ति, या गोष्टींत बोवांच्या काव्याचे मर्म - जीवन - सांठविलेले आहे. स्वानुभवाचें भान तुकारामबोवांच्या वाग्विलासांतून गाळून टाकिलें, तर त्यांचे कवित्वच पुसून टाकल्यासारखें होईल, हें लक्ष्यांत घेण्यासारखें आहे. अशा तऱ्हेचें विधान पंडित व मुक्तेश्वर यांच्या कृतीविषयीं केलें असतां तें सत्याच्या कसोटीस उतरणार नाहीं. पंडित, मुक्तेश्वर व तुकारामबोवा, यांच्यांतला चवथा फरक हा आहे कीं, पहिल्या दोघांचें व्यक्तिविषयक विशिष्टत्व भासमान होत नाहीं, परंतु बोवांची व्यक्ति सर्व महाराष्ट्राच्या अंत:करणांत आज अडीचशे वर्षेपर्यंत सतत जागरूक राहिली आहे. बोवांच्या चारित्र्याचा लोकहृदयावर असा ठसा उमटला आहे कीं, आजमितीसही बोबांच्या नामाचा गजर करीत व त्यांच्या साळ्याभोळ्या अभंगांचीं पारायणे करीत, हजारों भक्त- जन प्रेमळ भक्तीच्या रंगांत दंग होऊन निरतिशय निजानं- दांत डुलत असलेले दृष्टीस पडतात. म्हणून मोरोपंत म्हणतातः-

भगवद्भक्ति कराया बहु जड जीवांसि जो तुका सिकवी, ।
त्याच्या दुसरा धरणीवरि येइल कोण हो ! तुकासि कवी ? ॥

बोवांच्या अंतःकरणांत जो भक्तिरसाचा सागर उचंबळला, त्याचाच लोंढा आपोआप अभंगरूपानें खळाळत बाहेर पडला व त्यानें लाखों भाविकांचा आत्मा अमृतपूर्ण केला आहे. सृष्टिदेवीचा अत्यंत लाडका, विश्वाच्या प्रेमळ स्वरूपांत अगदी