पान:तुकारामबोवा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीसरस्वतीमंदिर.


अस्सल सगुणभक्तिमार्गांतील होत; तरी पण, परिस्थितीनें व प्रकृतिभेदानें त्यांच्यामध्यें ठळक निरनिराळेपणा दृष्टोत्पत्तीस येतो. पंडित हे षट्शास्त्रवेत्ते सगुणभक्त आहेत. त्यांनीं भक्तीला पांडित्याचा दुजोरा दिलेला आहे.पंडितांच्या म्हणून खास ठरलेल्या ग्रंथांमध्ये - विशेषतः त्यांच्या भगवद्गीते- वरील यथार्थदीपिकानामक विस्तृत टीकेमध्यें - व्याकरणव्युत्पत्ति, तर्कन्यायादि शास्त्रे, श्रुतिस्मृति, इत्यादिकांच्या आधारानें भगवद्गीतेचें निःसीम सगुणभक्तीस अनुकूल असें जें रहस्यावि- ष्करण केलें आहे, तें पाहिलें म्हणजे ज्ञानेश्वरादिकांच्याही हातून जें घडलें नाहीं, तें पंडितांनी सावलें आहे, असें आम्ही कां म्हणतों, तें लक्षांत येईल. ज्ञानेश्वरांची टीका झुळझुळ वाहणाऱ्या, अत्यंत चविष्ट, सत्त्वपोषक व शीतल झऱ्याप्रमाणे आहे. पंडितांची टीका पांडित्यप्रकर्षाची आग पेटवून बाष्पी - करणपद्धतीने अगदी शुद्ध-निर्भेळ - केलेल्या जलसंचयाप्रमाणें आहे. गोडगोड बोलून, प्रेमळपणानें गोंजारून, सन्मार्गाला लावणारे ज्ञानदेवादि संत, तर, प्रमाणांचा पाऊस पाडून व ठांसून कोटिक्रम करून सन्मार्गाची सिद्धता करूं पाहणारे वामनपंडित, अस्तु. पांडित्यतेजानें वामनपंडितांच्या भक्तिपर ग्रंथांनाही अनेक ठिकाणी कडकपणा व रूक्षपणा आलेला आहे, ही मूळ मुद्याची गोष्ट होय. मुक्तेश्वर कवींच्या काव्याकडे पाहिलें, तर असे आढळतें कीं, हातीं घेतलेलें आख्यान चट- कारपणानें योग्य रसपोषण करून सजविणें हें त्यांचें साध्य आहे. मुक्तेश्वर हे श्रद्धाळु सगुणभक्त तर खरेच, पण वामन- पंडितांप्रमाणें पांडित्यक्षेत्रांत न शिरतां, भक्तिगौरवास्तव नवर-समय, काव्यप्रतिभायुक्त व वाग्भूषणभूषित, अशी प्रकरणें