पान:तुकारामबोवा.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा

२७

असे उद्गार ज्या जनकाविषयीं तुकारामवोवांच्या तोंडून निघाले आहेत, त्याचा आकस्मिक अंत झाला असतां, बोवांना किती उदास व निराश्रित वाटलें असेल, याची कल्पना वाचकांनींच आपल्या मनाशीं करावी. वडील वारले, ज्येष्ठ बंधु संसाराविषय उदासीन, आई ह्मातारी, एक बायको सदाची दुखणेकरी, दुसरी बायको तापट व फटकळ, धाकटा भाऊ अगदींच पोरवयाचा, अशी परिस्थिति असतांना, तुकारामबाबांचा धीर सुटून त्यांचें अंतःकरण दडपून गेलें असले, तर त्यांत फारसें नवल नाहीं. तरी पण, संसार पूर्वीप्रमाणेंच हांकण्याचे त्यांनी आपलें व्रत ढळूं दिलें नाहीं व कुटुंबांतील माणसांस उणेपणा भासूं दिला नाहीं. पण हें फार दिवस टिकलें नाहीं. तुकाराम- बोवांवर एकावर एक दुर्दैवाचे आघात झाले व चारपांच वर्षांतच त्यांच्या संसाराची धूळदाण झाली. बापाच्या मागून लगेच आईचाही काळ झाला. पुढें व्यापाराला बराचसा धक्का बसून आंतसवाई होऊ लागली. लोकांकडे येणें बरेंच थकलें; 'बाकी फेडण्याबद्दल तगादा लावणें किंवा दिवाणदर- बार करणें हें तुकारामबोवांच्या भाविक व दयाळू बुद्धीस पटेना, म्हणून वसूल मंदावून गेला; आणि सावकारांच्या देण्याची धोंड उरावर येऊन पडली. इतक्यांत देशांत भयंकर दुष्काळ पडला. त्यामध्यें तुकारामबोवांच्या घराण्याची अशी कांहीं विलक्षण दैना उडाली, कीं पुसूंच नये. बोवांचें दिवाळे वाजलें. मध्यान्हा- चीही भ्रांत पडूं लागली. घरांत धान्याचा कण नाहीं व पदरीं विष खायालाही दमडी नाहीं. आपण उजेडामधून एकदम काळोखांत आलों, म्हणजे तो काळोख जसा विशेषच दाट भासतो, त्याप्रमाणें भरभराटीचा उपभोग घेऊन दारिद्र्याच्या