पान:तुकारामबोवा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
श्रीसरस्वती मंदिर.

पटावर दिव्यवर्णानी ठसविला, त्याला मुळींच संधी मिळतीना. परंतु ईश्वरीसंकेत व दैवाचे योगायोग कांहीं निराळेच होते. कारण एकाएकीं तुकारामबोवांच्या संसारसमुद्रामध्यें भयंकर वादळ उत्पन्न झालें व या वादळांत ऐहिक सुखें, विषयोपभोग, धनधान्य- संपत्ति, इत्यादिकांसह त्यांच्या प्रपंचनौकेस जलसमाधि मिळाली. या वादळास तुकारामबाबांच्या वडिलांच्या मृत्यूपासून आरंभ झाला. तुकारामबोवांचे वडील एकाएकीं वारले व संसारांत पुढारीपण पत्करलेल्या तुकारामबोवांवर हा एक मोठाच कठीण प्रसंग कोसळला. बोल्होबा जिवंत होते, तोंपर्यंत संसाराचें धोरण त्यांच्या अनुभविक सल्ल्याने चालत असे. केव्हां कसाही प्रसंग आला तरी बोल्होबांचा आपल्याला पूर्ण आधार आहे असें मनांत आलें, ह्मणजे तुकारामबोवांना संसार- कृत्ये करण्यांत उल्हास वाटत असे व फार धीर येत असे. उत्तम थाटलेला संसार आपल्या हातीं दिला व पुढें वेळोवेळीं अडीअडचणीला हितावह उपदेश करून योग्य मार्ग दाखविला, ह्मणून आपल्या वडिलांविषयीं तुकारामवावांच्या हृदयांत अत्यंत कृतज्ञता वसत असे:-

बाप करी जोडी लेंकराचे ओढीं, । आपली करवंडी वाळवून. ॥ १
एकाएकीं केला मिरासीचा धनी, । कडिये, वागवूनी भार, खांदीं. ॥ २
लेववूनी, पाहे डोळां, अळंकार; । ठेवा दावी थोर करूनीयां ॥ ३
तुका ह्मणे, नेदी गांजू आणिकांसी, । उदार जीवासी आपुलिया ॥ ४ ॥ "