पान:तुकारामबोवा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

२५

कोचें नांव *रखमाई होतें. ही बाई दमेकरी असल्यामुळे संसार- कृत्याला बहुतेक 'नालायक होती. ह्मगून बोल्होबांनी दुसरी चांगली धनधाकट मुलगी पाहून, तुकारामबाबांचा दुसरा संबंध जुळवून दिला. ही पुण्यांतील आपाजी गुळवे नांवाच्या सात्रका- राची मुलगी होती व ती अवलाई "ऊर्फ जिजाबाई या नांवानें प्रसिद्ध आहे.
 तुकारामबोवांच्या दुकानावर गि-हाईक अतिशय लोटत असे; याचें मुख्य कारण बोवांचा गोड, परोपकारी स्वभाव व सात्त्विक आचार हेंच होय. लांडीलवाडी किंवा खोटेंनाटें तुकारामबाबांच्या हातून होणार नाहीं, अशी सर्वांची बालंबाल खात्री असल्यामुळें, बोवांचा उदीम चांगलाच तेजीला आला. अहंभाव, राग, अनावर लोभ, दुष्टबुद्धि व कपट, यांचा तुकारामबोवांना कधींच विटाळ झाला नाहीं. पदराला खार लावून दु:खितांचे दु:ख कमी करण्याच्या कामांत त्यांच्याकडून कधींही कसूर झाली नाहीं. दानधर्म करण्याची व साधुसंतांचा परामर्श घेण्याची त्यांना नेहमींच उत्कट हौस असे. आपला व्यवसाय संभाळून जो रिकामा वेळ सांपडे, तो सर्व बोबा ईश्वरसेवेंत व नामसंकीर्तनांत घालवीत असत.
 याप्रमाणे भवसमुद्रांतील यात्रा मोठ्या मजेनें चालली असतां, तुकाराम बोवांना मानवी जिण्याच्या क्षणभंगुरत्वाविषय थोडाबहुत विसर पडून, ते सुखसमाधानांत गर्क होण्याचा फार संभव होता; आणि तसें झालें असतें, म्हणजे त्यांच्या हातून पुढें जें अलौकिक कार्य घडून आलें व त्यांनी जो दिव्य संदेश जनतेच्या हृदय-


 * हिचें माहेर लोहगांवीं होतें असें समजते. लोहगांव देहूच्या नजीकच आहे व या गांवीं बोवांचे वारंवार जाणेयेणें घडत असे.