पान:तुकारामबोवा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

२३

तुका ह्मणे केला निवाडा रोकडा,
राऊत हा घोडा हातोहातीं ॥ ४

 बोल्होबाच्या तिन्ही मुलांचा कल स्वभावतः भगवत्सेवेकडे होता. पण त्यांतल्या त्यांत मोठा मुलगा जो सावजी, यानें आपलें अंग संसारांतून आरंभापासूनच काढून घेतलें होतें. त्याचें लग्न जरी झालें होतें, तरी त्याच्या योगानें त्याच्या वैराग्याला मुळींच आळा पडला नाहीं. त्याचें शरीर मात्र घरांत होतें, पण त्याचें मन निरंतर त्याच्या- पासून अलिप्त राहून विरक्तिसुखांत मग्न असे. बोल्होबांचा वृद्धापकाळ झाल्यामुळे, उत्साह व बळ हीं आटून गेलीं, व ह्यांना प्रपंचाचें ओझें आतां असह्य होऊं लागलें. आतां हें संसाराचें जूं आपल्या कोणत्या तरी मुलानें स्वतःच्या शिरावर घ्यावें, अशी त्यांना उत्कट आशा लागून राहिली. तेव्हां त्यांनीं सावजीला आपल्याजवळ बोलावून सांगितलें कीं, “बाबारे ! उतारवयामुळे आतां माझ्या अंगांत त्राण राहिलें नाहीं वही संसाराची दगदग मला होत नाहीं. तूं माझा वडील मुलगा आहेस. तेव्हां माझें ओझें हलकें करणें हैं तुझें कर्तव्य आहे. इतके दिवस तूं फटकून होतास, तें कसेंतरी चाललें. पण यापुढें असें करून कसें चाल- णार ? तूं या विरक्तीच्या बंडाला आतां दूर कर, आणि थाटलेला प्रपंच नीट आवरून यांत परमार्थसाधन कर.' पण सावजी पुरा मख्ख होता; त्याने बापाचें म्हणणें मुळींच मनावर घेतलें नाहीं. त्यानें सांगितलें कीं, "तुम्ही वडील माणसें घरांत आहां, म्हणूनच केवळ मी येथें राहिलों आहे; पण तुम्ही जर मला संसारांत गुंतवूं पहाल, तर मी येथून तडक चालता होऊन कोठें तरी क्षेत्रवास करीन अगर तीर्थाटनांत आयुष्य " घालवीन."