पान:तुकारामबोवा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तुकारामबोवा.

२१

तर, त्याचा प्रभाव नामांकित संतश्रेष्ठांच्या शिष्यमंडळ्यांतही त्यांच्या मार्गे घुसलेला व कमीअधिक अंशाने अनर्थवहही झालेला आढळांत येतो. अस्तु.
 तुकारामबोवांना वस्तुस्थित्याच जरी वेदशास्त्राध्ययन अशक्य होतें व दांभिक वेदांत्यांचा आणि शब्दज्ञान्यांचा अभिमान त्यांना गर्ह्य वाटत होता, तरी खरे शास्त्रज्ञ व वेदज्ञ यांस मान दिला पाहिजे व वेदशास्त्रांनीं केलेले विधिनिषेध हे पाळलेच पाहिजेत, असें त्यांनी मोठ्या एकनिष्ठभावाने सांगितलें आहे :-

'वेदशास्त्र नाहीं पुराणप्रमाण,।
तयाचें वदन नावलोका. ॥ १
तार्कियाचे अंग आपणा पारिखे ।
माजा सारिखें वाईचाळे. ॥ २
माता निंदी तया कोण तो आधार ? ।
भंगले खापर याचे नांवें ॥ ३
तुका म्हणे, आड-रानें ज्याची चाली, ।
तयाची ते बोली मिठेंवीण. ' ॥ ४

 एकंदरींत वेदशास्त्रपुराणांनीं घालून दिलेलें शासन योग्य रीतीनें पाळिलें पाहिजे, पण दंभ, ताठा, कपट, दुराग्रह, निव्वळ श- व्दज्ञान व केवळ बाह्याकाराचे भेदभाव नकोत, अशा प्रकारचे संस्कार उत्पन्न करणारें नैतिक गृहशिक्षण तुकारामबोवांना प्रत्यक्ष उदाहरणांवरून लाभलें होतें. वामनस्वामींसारखे विद्यासंपन्न ब्राह्मण तुकारामबाबांजवळ उपदेशार्थ आले असतां, 'आपण शूद्र आहों; तुम्हांला उपदेश करण्याचा अधिकार आम्हांला नाहीं;' असे सांगून बोवांनीं त्यांना जें रामदासस्वामींकडे धाडिलें, त्याचें कारण वरील शिक्षणांतच आहे.