पान:तीन तत्वज्ञानी.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


खर्च केले व आपल्या स्नेह्यांच्या आग्रहावरून त्याने यासंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहिला. या ग्रंथांत त्याने शास्त्राय तत्वांवर,अशा गोष्टींचे ज्ञान मानवी शक्तीच्या बाहेर आहे, असे आपले मत प्रतिपादन केले. यावरून कँट हा फार बहुश्रुत होता, असे दिसून येईल.

 कॅटमध्ये इतका बहुश्रुतपणा येण्याचे कारण त्याची वाचनाभिरुचि तर खरी, परंतु त्याची कल्पकता व कल्पनाशक्ति या फार दांडग्या होत्या: यामुळेच त्याला इतक्या विषयांचे सोपपत्तिक व साग्र ज्ञान मिळवितां आले. त्याची कल्पनाशक्ति केवढी दांडगी होती, याचा प्रत्यय खालील दोन गोष्टींवरून चांगला येतो.

 डी क्वेन्सी या इंग्रज ग्रंथकाराने या गोष्टीचे मोठ्या विरोधाभासाने वर्णन केले आहे. तो म्हणतो:-" कँटने एकही पुस्तक आजन्मांत वाचले नाही, असें मी बेलाशक विधान करतों व हे माझे म्हणणे मी शाबीतही करतो ! सकृदर्शनों हे विधान अगदी खोटे दिसते. ज्याची बहश्रुतपणाबद्दल इतकी ख्याति, तो मनुष्य एकही पुस्तक वाचीत नाही, हे संभवनीय तरी कसे होईल ? परंतु कॅट हा समग्र पुस्तक केव्हांहि वाचीत नसे. हे अगदी खरे आहे ! कोणतेंहि पुस्तक असले म्हणजे ते आपले शब्दशः वाचीत जावयाचे, अशी त्याची रीत नव्हती. तर मधूनमधून तो पुस्तक वाची, काही भाग वाचला म्हणजे त्या पुढे ग्रंथकाराने काय लिहिले असले पाहिजे, हे तो आपल्या कल्पनेने जाणून तो भाग टाकून पुढे जाई. सारांश, तो पुस्तकांतील एकंदर मतलब व नवे विचार तेवढे ध्यानांत धरी: बाकी विषयाचा आपल्या पूर्वं च्या ज्ञानावरून तो अंदाज करी, परंतु अशा अर्धवट वाचनाने त्याचे ज्ञान अर्धवट होई, असे मात्र नाही. तो पूर्वी ठाऊक असलेली माहिती वाचण्यांत वेळ घालवीत नसे, इतकेंच. या त्याच्या वाचनपद्धतीमुळे त्याला बहुश्रुतपणा व विषयवैचित्र्याभिरुचि ही मिळवितां आली."

 दुसरी त्याच्या कल्पनेची गोष्टही आश्चर्य करण्यासारखी आहे. मागे सांगितलेच आहे की, कॅट हा आपले गांव सोडून कचितच जात असे ,

८९