पान:तीन तत्वज्ञानी.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

 त्याने कानिग्सबर्जपासून समुद्र जवळ असतांना सुद्धां समुद्र आजन्मांत पाहिला नव्हता! तरी पण त्याला भूगोलाचे ज्ञान फारच असे व त्याची कल्पनाशक्ति इतकी तीव्र होती की तो आपल्या कल्पनेने सर्व विषयांचे स्वरूप आपल्या मनापुढे उभे करीत असे व यामुळे तो हुबेहूब वर्णन करूं शके, एका व्याख्यानांत कॅट हा इंग्लंडमधील वेस्टमिनिस्टर पुलाची माहिती सांगत होता. ती माहिती सांगत असतांना त्याने त्या पुलाचें अगदी हुबेहूब वर्णन केले. त्या व्याख्यानाला एक इंग्रज गृहस्थ हजर होता. व्याख्यानाच्या शेवटी त्याने कॅटची मुलाखत घेतली व "आपण इंग्लंडांत किती वेळ गेला होतां ? " असे त्याने त्याला विचारले. त्यावर " आपण इंग्लंड पााहेलेही नाही," असे त्याने उत्तर दिले. हे ऐकून तो इंग्रज गृहस्थ थक्क झाला. त्याला कांहीं तें खरें वाटेना! कॅट जी जी माहिती ग्रंथांवरून व प्रवासवृत्तावरून मिळवी, तिच्याशीं तो आपल्या मनाचे तादात्म्य करून घेई व त्याचे बरोबर स्वरूप मनांत ठेवी. या कल्पनाशक्तीमुळे त्याची भूगोलविषयक व्याख्याने इतकी उत्तम वठत असत, वास्तविक पाहतां भूगोलविषयक पदार्थविज्ञानाला प्रत्यक्ष अवलोकन जास्त पाहिजे, तसेंच लोकांच्या चालीरिती, मनुष्यांच्या प्रकाराच वर्णन, मनुष्यांतील वर्णभेद वगैरे समाजशास्त्रीय गोष्टींना अवलोकन व प्रवासाची जास्त जरूर आहे. कॅट हा प्रवासी नसतांना सुद्धा या दोन विषयांत त्याचा हातखंडा असे.

 जरी कँट कधी प्रवास करीत नसे, तरी त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म होती, यांत शंका नाही. त्याने 'सौंदर्य व भव्यता' या विषयावर १७६४ मध्ये एक उत्तम निबंध लिहिला. तो भाषेच्या व मनोरंजकतेच्या दृष्टीने त्याच्या उत्तम ग्रंथांपैकी एक आहे, यांमध्ये कॅटची सूक्ष्म अवलोकनश चांगली दिसून येते.

 येथपर्यंत कँटच्या बहुश्रुतपणाचे थोडक्यांत विवरण केले, परंतु कँटची कीर्ति मुख्यतः त्याच्या तत्वज्ञानविषयक ग्रंथांवरून झालेली आहे. त्याच्या तात्विक व इतर ग्रंथांविषयींचें थोडक्यांत विवेचन पुढे करावयाचे आहे.

९०