पान:तीन तत्वज्ञानी.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


कडे पहात असे. त्या मनोऱ्याच्या टोकाकडे दृष्टि दिली, म्हणजे त्याचे चित्त एकाग्र होऊन त्याची विचारशक्ति चांगली चाले. परंतु कॅटच्या शेजाऱ्याच्या बागेत पॉपलर नांवाचे वृक्ष होते, ते वाढत वाढत जाऊन एके दिवशी तो मनोरा कँटच्या दृष्टिआड झाला. या आडकाठीने कॅटच्या चित्ताची एकाग्रता न साधून त्याच्या विचाराच्या व्यवसायांत व्यत्यय येऊ लागला. आपल्याला यामुळे काही सुचत नाही असे कँट आपल्या मित्राजवळ बोलला. त्या मित्राने ही अडचण त्या शेजाऱ्याला सांगितली.शेजारी चांगला भला मनुष्य होता व त्याला कँटबद्दल आदरहि होता.तेव्हां त्याने आपली पॉपलर झाडे छाटून टाकली व कॅटला तो मनोरा पुनरपि दिसू लागला, आणि तेव्हापासून त्याच्या विचारांचे काम पुनः निर्वेधपणे चालू झालें !

 त्याच्या असल्याच संवयीची आणखीहि एक गोष्ट सांगतात. कँट वात व्याख्यान देतांना बहुधा एका विवक्षित मुलाकडे पहात असे व विशेषतः त्याच्या एका बटणाकडे पहात राही; परंतु एके दिवशी त्या मुलाच्या कोटाचे बटन पडून गेले व त्या दिवशी कॅटच्या व्याख्यानाचा अगदी घोटाळा झाला. त्याला नेहमी प्रमाणे बोलतां येईना व क्रमवार विचार सुचेनात!

 कॅटचे मुख्य व्यवसाय दोन, हे वर सांगितलेच आहे. एक लेखन व दुसरा अध्ययन. कँट हा फार मोठा तत्त्वज्ञानी होऊन गेला, अशी जरी त्याची कीर्ति आहे तरी तो मारूनमुटकून तत्वज्ञानी झाला, असें म्हणण्यास हरकत नाही. कारण लहानपणापासून त्याचे आवडते विषय म्हणजे गणित व आधिभौतिक शास्त्रे हे होते. अगदी लहानपणापासून त्याला न्यूटनच्या ग्रंथांचा फार नाद लागलेला होता. तत्वज्ञानाकडे त्याचे लक्ष्य मागाहून गेले व हाच विषय शेवटी त्याचा मुख्य विषय बनला. पण कॅट हा केव्हांहि घटपटाची खटपट करणारा तत्वज्ञानी बनला नाही. त्याच्या अंगी बहुश्रुतपणा व विषयवैचित्र्याची अभिरुचि शेवटपर्यंत कायम राहिली. सामग्रंथ व लेख निरनिराळ्या विषयांवर आहेत. तो मासिक पुस्तकांत

८७