पान:तीन तत्वज्ञानी.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

 जेवणाच्या जागीं जमे. कँट आपला रुमाल बाहेर काढून सर्वांना सुरुवात करण्यास सांगे, व आपणहि जेवावयास सुरुवात करी. जेवण: बहुधा तीन वाढी असे, व तें सुमारे तीन व केव्हां केव्हां चार तासहि चाले. जेवणाच्या वेळीं पुष्कळ वेळां राजकीय विषयांवर संभाषण होई. कँट हा वर्तमानपत्रांचा मोठा भोक्ता होता, व वर्तमानपत्रे आणणाऱ्या पोस्टाकडे मोठ्या आस्थेनें त्याचे डोळे लागलेले असत.त्या वेळीं युरोपांत फ्रान्स-मधल्या राज्यक्रांतीची खळवळ चालू असे, व त्याच्या आधी अमेरिकेतील स्वतंत्रतेकरितां युद्ध झाले, त्याची खळवळ चालू असे. कँटचा ओढा नेहमी स्वातंत्र्याकडे व प्रजापक्षाकडे अरे, जेव्हां फ्रान्समध्ये प्रजा-सत्ताक राज्य स्थापन झाल्याची बातमी त्यानें ऐकली, तेव्हां तो म्हणाला, आज माझ्या डोळ्यांचें पारणे फिटले ! आतां मी सुखानें मरेन ! "

 जेवण आटोपल्यावर म्हणजे ४ वाजल्यानंतर कॅट फिरावयास निघे. पहिल्यांदा तो इतर लोकांबरोबर फिरावयास जाई, पण पुढे पुढे तो एकटा फिरावयास जात असे. कारण नाकांतून श्वासोच्छ्वास केल्यानें रोगजंतु पोटांत जाणार नाहीत, असे त्याला वाटे. व म्हणून तो फिरतांना व बोलतांना तोंड मिटून चालत असे. त्याचा दुसरा एक नियम असे, तो हा कीं, केव्हांही अंगाला घाम येतां कामा नये. कॅट हा नाजूक प्रकृतीचा होता; धट्टाकट्टाही नव्हता, किंवा तो नेहमीं आजारी असेही नाहीं. तरी पण खाण्यापिण्यासंबंधी व वागण्यासंबंधी बाताबेतानें राहून तो इतकी वर्षे जगला. रपेट करून आल्यावर बारीकसारीक कामे करावयाची, नवीन पुस्तकें चाळावयाचीं व वर्तमानपत्रे पहावयाची, काळोख पडल्यावर तो आपल्या आवडत्या विषयावरील प्रश्नासंबंधी विचार करीत बसे, रात्री दहांच्या सुमाराला तो निजावयास जाई. ही त्याची दिनचर्या दिवसानुदिवस, मासानुमास व वर्षानुवर्ष चाले.

 त्याच्या या व्यवसायासंबंध एक मजेदार गोष्ट सांगतात. कँट हा आपल्या अभ्यासाच्या खोलीत बसून विचार करी व मनाची एकाग्रता होण्याकरतां आपल्या खिडकींतून दिसणाऱ्या एका देवळाच्या मनोऱ्या-

८६