पान:तीन तत्वज्ञानी.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


दुसऱ्याला करून देई. यामुळे कँटच्या घरी जेवावयास जाणे म्हणजे भाग्याचे आहे असे सर्वांना वाटे.

 कँट हा फार नियमितपणे चालणारा मनुष्य असल्यामुळे व त्याचा व्यवसायहि वैचित्र्यविहीन असल्यामुळे कँटच्या आयुष्याचे चित्र रेखाटणे सोपे आहे. कारण, एक दिवसाचा क्रम तोच आठवड्याचा, तोच महिन्याचा व तोच वर्षांचा. हा त्याचा नियमितपणा आश्चर्य करण्यासारखा होता. त्याची सर्व कामें घड्याळाप्रमाणे चालत असत. त्याच्या दिनचर्येचें खालील वर्णन त्याच्या चरित्रकारांनी दिलेले आहे.

 पहाटेला पांच वाजायला पांच मिनिटें कमी असतांना कँटचा नोकर लॅपी हा कँटच्या खोलीत शिरावयाचा व “प्रोफेसरसाहेब. वेळ झाली" असे म्हणावयाचा. या हाकेला कँट कधीहि न चुकतां ओ द्यावयाचा. व पांच मिनिटांत तो आपल्या बसावयाच्या खोलीत यावयाचाच. न्याहारीला तो चहाचा एक पेला-कधी कधी नकळत दोन तीन पेलेहि घेत असे-व तंबाकूची एक विडी घेई. ५ पासून ७ वाजेपर्यंत तो व्याख्यानाची तयारी करी. ७ वाजतां तो आपल्या शिकवावयाच्या वर्गात जाई व तेथन ९ वाजतां परत येई. तेव्हांपासून पाऊण वाजेपर्यंत तो आपल्या लेखनव्यवसायांत गुंतलेला असे. पाऊण वाजतां 'पाऊण झाला' असें म्हणून आपल्या स्वयंपाकिणीला हांक मारी, व त्याबरोबर स्वयंपाकीण दारूचा पेला घेऊन येई. जेवणाचे पहिले वाढप झाल्यावर कँट हा पेला पीत असे. त्याच्या आयुष्याच्या शेवटची पंचवीस वर्षे-(जेव्हां त्याचें स्वतंत्र घर असे) त्याच्याबरोबर नेहमी पाहुणे जेवावयास असत. पाहणे दोहोंपेक्षा कमी नसत व पांचापेक्षा जास्त नसत. या पाहुण्यांना जेवणाच्या दिवशींच्या सकाळी बोलावणे पाठविले जात असे. एकदम बोलावणे करून ठेवणे त्याला आवडत नसे, किंवा आधीपासून केलेलेंहि आवडत नसे; परंतु कँट आपल्या पाहुण्यांपासून एका गोष्टीची अपेक्षा करी. व ती म्हणजे नियमितपणा ही होय! सर्व पाहुणे जमले, म्हणजे लपी जेवणाच्या तयारीची वर्दी देई. हवेबद्दल बोलत बोलत सर्व मंडळी

८५