पान:तीन तत्वज्ञानी.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


शिक्षकांचे वेतन मुळी त्यांच्या व्याख्यानांच्या चांगुलपणाघर अवलंबून असे. त्यांची व्याख्याने जर चांगली नसतील तर त्यांच्याकडे विद्यार्थी जाणार नाहीत, व त्यांचे वेतन तर मुलांच्या फीवर अवलंबून; तेव्हां त्यांना आपले बुद्धिसर्वस्व आपल्या विषयावर खर्च करावे लागे. पगारी प्रोफेसरांना मुलांच्या फीवर विसंबावे लागत नसे. परंतु त्यांचा दर्जा व मान मोठा असल्यामुळे तो राखण्याकरिता त्यांनाहि फार मेहनत करावी लागे. कारण जर त्याची व्याख्याने चांगली नसली व बिनपगारी शिक्षकांची चांगली असली तर मुले बिनपगारी शिक्षकांकडे जातील व असे झाले म्हणजे ती प्रोफेसराला कमीपणाची गोष्ट वाटे. या पद्धतीमुळे बिनपगारी शिक्षक व पगारी प्रोफेसर या दोघांनाहि आपापल्या विषयांत फारच पारंगतता मिळवावी लागते. असो.

 बिनपगारी शिक्षक या नात्याने कँटने सुमारे पंधरा वर्षे काढल्यानंतर १७७० साली त्याची महत्त्वाकांक्षा पुरी झाली. त्याला तत्त्वज्ञानाच्या प्रोफेसराची फार मोठ्या मानाची जागा मिळाली, व त्या जागेवर तो मरेपर्यंत होता. दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला प्रोफेसरांच्या जागा देऊ केल्या होत्या, परंतु त्याने आपली युनिव्हर्सिटी सोडली नाही, व तेथली जागा कमी पगाराची असतांना तेथेच राहणे त्याला बरे वाटले .

 कँटचे सर्व आयुष्य अध्ययन, अध्यापन आणि लेखन यांमध्येच गेले. यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये किंवा चरित्रामध्ये वैचित्र्य किंवा निरनिराळे प्रसंग नाहीत, हे खरे आहे. त्याचा आयुष्यक्रम अगदी आपल्या इकडल्या ऋषीसारखा होता. कारण, कँट संसारपाशांत पडला नाही. प्रथमतः त्याची फार गरिबी होती, व कुटुंबपोषण करण्यासारखी पैशाची स्थिति नव्हती. यामुळे त्याने लग्न केले नाही. पुढे चांगली स्थिति आल्यावर त्याला लग्न करता आले असते, व एका ईवर कँटचे मनहि गेले होते; परंतु त्या बाईने दुसऱ्या एका गृहस्थाशी लग्न केल्यामुळे कॅटचा बेत तसाच राहिला. पुढे आपले लग्नाचे दिवस निघून गेले, असें समजून कँट ब्रह्मचारीच राहिला. कँटच्या या एकलकोंड्या आयुष्याबद्दल

८३