पान:तीन तत्वज्ञानी.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कँट


कांना बुडवू इच्छित नाही. फार तर पाऊलभर पाण्यांत वाचकांना नेऊन तेथून मी त्यांना कोरडया जागेवर आणून सोडीन. या लेखात मला कँटचे मुख्यत: चरित्र सांगावयाचे आहे. आणि जितके कॅटचे तत्वज्ञान नीरस, गूढ व दुर्बोध आहे, तितकेच त्याचे चरित्र सरस, साधे व सुगम आहे, असे आपल्यास आढळून आल्याखेरीज रहाणार नाहीं.

 ज्याप्रमाणे अथेन्सचे नांव काढल्या बरोबर सॉक्रटिसाची आठवण होते. कारण अथेन्स व साँक्रटिस यांमध्ये एक प्रकारची व्याप्ति आहे-सॉक्रेटिसाचे सर्व आयुष्य या एका शहरांतच गेले, त्याचप्रमाणे कँट व कानिग्सबर्ज यांचीहि व्याप्ति आहे. मात्र अथेन्स शहर हे सॉक्रेटिसाच्या आधींपासून जगद्विख्यात शहर होते. परंतु कानिग्सबर्जची तशी स्थिति नव्हती. कँटच्या पूर्वी हे जर्मनींतील विद्यापीठ अगदी अज्ञात, मागसलेले आणि एका कोनाकोपऱ्यांतले होते; परंतु कँटच्यामुळे त्याला सरस्वती मंदिराची पदवी आली व ज्याप्रमाणे एखाद्या पुण्यक्षेत्री भाविकांची यात्रा भरावी. त्याप्रमाणे कॅट या तत्ववेत्त्याला पाहण्याकरतां युरोपांतील हजारों विद्याभक्त आणि विद्याभाविक लोक त्या ठिकाणी येऊ लागले.

 कानिग्सबर्ज या गांवीं कॅटचा जन्म १७२४ च्या एप्रिल महिन्यांत झाला. कॅटच्या बापाचा कातड्याच्या वाद्या करण्याचा धंदा होता. त्याची घरची स्थिति फार गरीबीची होती, तरी पण तो मोठा बाणेदार मनुष्य होता. व त्याला आपल्या मतांचा मोठा अभिमान असे. क्रिश्चन धर्मोतील एक पोटभेद भक्तिपथ म्हणून निघाला होता, त्याचा तो अनुयायी होता व या आपल्या मताकरतां तो लोकच्छल सोसण्यासही तयार असे. कँटची आईहि फारच भाविक असे व कॅटच्या मनावर तिच्या भक्तिपंथी शिक्षणाचा फार ठसा उमटला होता. कॅट आपल्या उतारवयांत सुद्धां आपल्या आईबद्दल मोठया प्रेमाने आणि आदराने बोलत असे. कॅटचे सर्व शिक्षण या गांवांतच झाले. कँटच्या तेराव्याच वर्षी त्याची आई आपल्या एका मैत्रिणीची शुश्रूषा करीत असतांना ताप येऊन वारली. कँट आपल्या सोळाव्या वर्षी मॅट्रिक्युलेशन पास होऊन कॉलेजांत गेला.सा...६

८१