पान:तीन तत्वज्ञानी.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

 बार्क्लेचा पहिला तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ म्हणजे 'दृष्टीची नवी मीमांसा' हा होय. या ग्रंथाचा विषय बाह्यतः तत्त्वज्ञानाचा दिसत नाही; पण या विषयाचे पर्यवसान तात्त्विक आहे असे बार्क्लेने दाखविले आहे. आपल्या पांच ज्ञानेंद्रियांमध्ये आपण दृष्टीला किंवा डोळ्यांना जास्त महत्व देतो. कोणत्याही बाह्य गोष्टीच्या किंवा जड द्रव्याच्या अस्तित्वाचे अत्यंत भरंवशाचे प्रमाण म्हणजे अवलोकनाचे होय असे आपण म्हणतो, 'चक्षुवैसत्यं' या म्हणीवरून सत्यशोधनांत डोळ्याचें केवढे महत्त्व आहे हे समजते. 'प्रत्यक्ष' हा शब्दही तेच दाखवितो जडवाद्यांचे प्रमाणसर्वस्व म्हणजे प्रत्यक्ष होय. जेवढे डोळ्याने दिसते तेवढेच सत्य असें चार्वाकासारखे तत्त्वज्ञानी मानतात. असें या प्रत्यक्ष प्रमाणाचे महत्त्व असल्यामुळे बार्क्लेने या प्रमाणाचे पृथक्करण आपल्या ग्रंथांत केले आहे.

 वस्तूंवा आकार, त्यांचे रंगरूप, त्यांची लांबी रुंदी खोली-सारांश वस्तूंचे मुख्य मुख्य गूण-विशेषतः त्या वस्तूंना जडत्व देणारे गुण-तसेंच वस्तूंमधले अंतर म्हणजे वस्तूंचे दूरपण किंवा नजीकपण हे सर्व गूण आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो असें सामान्यतः समजले जाते. पण बार्क्लेने असें प्रतिपादन केले की, हा आपला समज चुकीचा आहे. आपण खरोखरी हे सर्व विविध गुण प्रत्यक्ष पहात नाही, तर प्रत्यक्ष पाहिलेल्या गुणांवरून आपण इतर गुणांबद्दल अनुमान-अंदाज करतो.

 दृष्टीचा खरा विषय रंग आहे. पदार्थापासून निघणारे किरण आपल्या डोळ्यांच्या बुबुळावर पडतात व आपल्या डोळ्यासमोर कमी अधिक स्पष्ट अशी रंगाची आकृति उभी राहते. आपल्या बुबुळांवर पदार्थाच्या किरणांची टाके पडतात. तो किरण दुरून आला किंवा जवळून आला हे किरणाच्या कमी अधिक लांबीवरून कळणे शक्य नाही. कारण किरणांची लांबी आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्या डोळ्यांना अंतर-पदार्थाचा नजिकपणा किंवा रपणा हा प्रत्यक्ष दिसत नाही. दूरच्या पदार्थाकडून आलेल्या किरणांनी पाडलेली आकृति लहान व अंधुक असते, तर जवळच्या पदार्था

७१