पान:तीन तत्वज्ञानी.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)
बार्क्लेचे तत्त्वज्ञान.

 येथपर्यंत बार्क्लेचे संक्षिप्त चरित्र व कालानुक्रमाने त्याच्या ग्रंथांची माहिती दिली. बार्क्लेच्या चरित्राकडे पाहिले म्हणजे असे दिसून येते की, ज्याप्रमाणे केव्हां केव्हां कवि हे स्वयंस्फूर्तीने-अभ्यासाने-अनुकरणाने-परिश्रमाने नव्हें-कवि बनतात त्याप्रमाणे बार्क्ले हा स्वयंस्फूर्तीने तत्वज्ञानी बनलेला होता. कॉलेजापासून त्याचे तत्त्वज्ञानविषयक विचार चालू झाले व ते आमरणांत चालू राहिले. यामुळेच त्याचे तत्त्वज्ञानविषयक विचार ठाम किंवा स्थिर न राहता ते कांहींसे बदलत गेले व त्या विचारांचे सिंहावलोकन करणारास त्या विचारांची प्रगति होत गेलेली आहे असें दिसते. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानविषयक विचारामध्ये जणू काही अर्वाचीन युरोपच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे स्वरूप अल्प प्रमाणांत दिसून येते. म्हणूनच बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाच्या तीन पायऱ्या पडतात असें बार्क्लेच्या चरित्रकारांनी म्हटले आहे. बार्क्लेच्या आयुष्यातील तत्त्वज्ञानविषयक विचारांत एकप्रकारची एकसूत्रता असून त्याच्या विचारांची सारखी परिणती होत गेलेली आहे असे दृष्टीस पडते. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाचें सामान्य धोरण त्या काळी बोकाळत चाललेल्या जडवादाविरुद्ध व नास्तिक्याविरुद्ध होते. जगाचे आदि कारण जड पंचमहाभूते नसून चिन्मय असा परमेश्वर आहे हे त्याने युक्तीच्या साहाय्याने प्रतिपादन केले व हे करण्याकरितां 'मूले कुठारः' या न्यायाने त्याने असे दाखविण्याचा प्रयत्न केला की ज्याला जड द्रव्य किंवा पंचमहाभूते म्हणतात तीच मुळी चित्तत्वाची संवेदनात्मक स्वरूपे होत. आतां बार्क्लेच्या तत्वज्ञानविषयक विचारांचे क्रमाने विवेचन करूं.

७०