पान:तीन तत्वज्ञानी.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

लैंडांत मोठा दुष्काळ पडला व दुष्काळाची सोबतीण सांथ हीहि सुरू झाली. यामुळे हजारों लोक मरण पावले. या दुर्धर प्रसंगाने बार्क्लेचे लक्ष्य रोगाला एकादें औषध शोधून काढण्याकडे लागले. रोड बेटांत असतांना तेथील रहिवाशांकडून त्याने डामर या पदार्थाच्या विलक्षण गुणाबद्दल ऐकलें होते. त्यासंबंधी त्याने आतां प्रयोग चालविले व डामराच्या पाण्यापासून पुष्कळ ठिकाणी फार गुण येतो, असे त्याला दिसून आले. बार्क्लेच्या नेहमींच्या उत्साही स्वभावाप्रमाणे हे औषध सर्वरोगपरिहारक आहे, अशी त्याची समजूत होऊन डामराच्या पाण्याच्या रामबाणपणाबद्दल त्याने लेख लिहिले व त्याचा जनसमूहावर विलक्षण परिणाम झाला. जिकडे तिकडे डामराचे पाणी तयार करण्याचे कारखाने निघाले! या वेळी शास्त्रीय वैद्याबरोबर बार्क्लेला दोन हात करावे लागले व ते त्याने केलेहि. डामराच्या या विलक्षण शक्ती संबंधी बार्क्लेच्या डोक्यात विचार घोळू लागले. या काळी त्याचे वाचन प्लेटो व नीओप्लॅटनिझम यांबदल चालू होते. यामुळे या दृश्य जगाच्या मुळाशी कांहीं एक अदृश्य तत्व आहे अशी त्याची समजूत झाली व कशा तरी तऱ्हेनें डामरांत तें अदृश्य तत्व येत असावे, व म्हणूनच डामराच्या अंगीं सर्वरोगपरिहारक अशी विलक्षण शक्ति उत्पन्न होत असावी असे बार्क्लेच्या मनाने घेतले. याप्रमाणे वैद्यशास्त्र व तत्वज्ञान यांचा मिलाफ त्याच्या मनांत अवतीर्ण होऊन याच मनःस्थितीत त्याने 'सांखळी' म्हणून एक ग्रंथ प्रसिद्ध केला. यांतील डामरासंबंधाचा भाग अर्थात्च क्षणिक महत्त्वाचा होता. डामरासंबंधी बार्क्लेचे विचार अर्वाचीन वैद्यशास्त्राला संमत नाहीत. तरी पण डामर आणि त्याचाच पर्याय क्रिआसोट ही दोन औषधे अर्वाचीन वैद्यकांत कायमची आली, हा बार्क्लेच्या लेखांचा आणि प्रयोगांचा परिणाम होय, यांत शंका नाही ! परंतु 'सांखळी' या ग्रंथांतील तात्विक भाग हा कायमच्या महत्वाचा आहे व या भागावरून बार्क्लेच्या तात्विक विचारांची वाढ सारखी होत होती असे दसते. बार्क्लेच्या कालेजांतील तरुणपणच्या दिवसांत त्याचा विशेष ओढा जड द्रव्याचा अभाव सिद्ध करण्याकडे होता. या काळांत त्याचा

६७