पान:तीन तत्वज्ञानी.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

प्रत्यक्षावर जास्त जोर होता; व प्रत्यक्ष संवेदनाच्या पलीकडे ज्ञेय असे काही नाही, असे त्याने प्रतिपादन केले. त्याच्या मध्यआयुष्यात त्याचा भर नास्तिक लोकांविरुद्ध होता व त्याच्या उतारवयांत त्याची मते प्लेटोच्या सारखी होत चालली होती. दृश्य संवेदनाच्या किंवा इंद्रियांनी गोचर होणाऱ्या दृश्य जगाच्या पाठीमागे चिन्मय असें एक तत्व आहे व या चिन्मय तत्वाचा आपले दृश्य जग हा विकास आहे, असें बार्क्लेला भासू लागले होते, आणि हाच तत्वविचार 'सांखळी' या ग्रंथांत प्रमुखत्वाने आलेला आहे.

 बार्क्लेचा संसार मोठ्या सुखाचा झाला. त्याला बायको त्याच्या अनुरूप मिळाली होती. त्याला दोन मुलगे, एक मुलगी ( रोड बेटांत अगदी लहानपणी वारलेली मुलगी सोडून) इतकीच अपत्ये झाली. मात्र त्याच्या उतारवयांत त्याचा एक तरुण मुलगा वारला. प्रसिद्ध मुत्सद्दी बर्कला जसें पुत्रवियोगाचे दुःख झालें, तशीच बार्क्लेची स्थिति झाली. एका पत्रांत बार्क्लेने आपल्या या पुत्रनिधनाचा उल्लेख केलेला आहे. ते पत्र मनाला चटका लावण्यासारखे आहे:-

 "खाजगी व दरबारी व्यवसाय, व ज्याला लोकांत सुख मानतात, या सर्वांपासून मी अलिप्त होतो. माझ्या नजरेखाली शिकलेला माझा एक लहानसा मित्र होता. त्याचे चित्रलेखन मला आनंद देत असे, त्याचे गायन मला मोहून टाकी, आणि त्याचा तरतरीत व आनंदी स्वभाव माझी नेहमी करमणूक करी. देवाने माझा मित्र हिरावून नेला ! देवाची मर्जी ! त्याचे गुण व त्याचे स्वरूप, त्याचा साधेपणा, त्याची धर्मनिष्ठा व विशेषतः त्याची पितृभक्ति यांनी माझ्यावर फार छाप ठेवली होती. मला तो प्रिय होता, इतकेच नव्हे, त्याचा मला गर्व वाटे! या जगांतील वस्तूंवर ठेवू नये इतका मी त्याच्यावर आपला जीव ठेवला होता.”

 आतां बार्क्लेच्या आयुष्यातील एकच प्रसंगाची हकीकत सांगावयाचा राहिली. बार्क्लेने आपल्या मुलाला ऑक्सफर्ड विद्यालयांत घातले व आपणही आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस त्याच विद्यापीठाच्या ठिकाणी घाल

६८