पान:तीन तत्वज्ञानी.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

नात्याने तुम्ही मला विचारीत असाल, तर बार्क्लेने ताबडतोब युरोपला परत यावे, व देणगीची आशा सोडावी, असें मी सांगेन."

 याप्रमाणे मुख्य प्रधानाने एका उदार योजनेचा नाश केला, याबद्दल बार्क्लेला अत्यंत वाईट वाटले, हे उघड आहे.

 सरकारी मदतीच्या भरवशावर बार्क्लेनें रोड बेटांत सुमारे शंभर एकरांचे एक शेत विकत घेऊन तेथे त्याने लहानसे घर बांधले, व त्याला राजाच्या स्मरणार्थ 'व्हाईट हॉल' असें नांव ठेवले. त्याचा येथला व्यवसाय म्हणजे अध्ययन व लेखन हा होता. दहा बारा वर्षात त्याला असा शांत वेळ मिळाला नव्हता. तेथली सृष्टिशोभाहि बार्क्लेला फार आवडत असे. समुद्रकाठची एका खडकाची गुहावजा जागा ही बार्क्लेची आवडती बसावयाची जागा होती. या ठिकाणीच बार्क्लेचा कुटुंबविस्तार झाला. येथे त्याला एक मुलगा व,एक मुलगी झाली पण दुर्दैवाने मुलगी फार दिवस जगली नाही.

 सरकारी मदत मिळण्याची आशा नाही, हे ठाम झाल्यावर बार्क्लेला आपल्या योजनेचा नाद सोडून देणे भाग पडले, व तो आपल्या बायकांमुलांसकट १७३१ मध्ये इंग्लंडला परत आला. तरी बार्क्लेची अमेरिकेच्या सुधारणेची हौस कमी झाली नाही. त्याने आपले शेत येल विद्यालयांत शिष्यवृत्तीकरितां ठेविले. तसेच जमविलेल्या वर्गणीतून एक हजार पुस्तकांचा संग्रह त्याने येल विद्यालयाला नजर केला.

 इंग्लंडांत परत आल्यावर दोन महिन्यांनी बार्क्लेने तत्त्वज्ञान या विषयावरील आपला सर्वात मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. हाहि संभाषणात्मक आहे. हा ग्रंथ बार्क्लेच्या सर्व ग्रंथांत अत्यंत लोकप्रिय झाला. रोड बेटामध्ये जी अवर्णनीय सृष्टिशोभा त्याला पाहण्याला सांपडली व तात्त्विक अध्ययन अणि मनन करण्याला जी स्वस्थता मिळली, त्या दोहोंची छटा या ग्रंथांत दिसून येते. हा बार्क्लेचा ग्रंथ तात्त्विक विषयावर असूनहि तो फारच मनोरंजक झालेला आहे. त्याच्या ग्रंथावर काही ठिकाणी प्रतिकूल टीका झाली, व त्याला त्याने उत्तरात्मक दुसरे पुस्तक लिहिले.....५

६५