पान:तीन तत्वज्ञानी.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

जग चिन्मय आहे, असे म्हटल्यावर जडवादाला जागाच राहात नाही, आणि मग जीवात्मा व परमात्मा एवढीच चिन्मय तत्त्वे शिल्लक राहतात, आणि या योगाने मनुष्याची खऱ्या धर्माकडे प्रवृत्ति होईल असें बार्लेला वाटत असे. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाचा हेतु मनुष्याला धर्मपरायण करण्याचा होता, व औपचारिक कर्मकांडात्मक धर्माचारापेक्षा याच तात्त्विक धर्माला बार्क्ले जास्त महत्त्व देत असे. या दोन ग्रंथांनी बार्क्लेची स्वतंत्र विचाराचा तत्त्वज्ञानी व उत्तम लेखक अशी ख्याति झाली.

 काही अंशी प्रकृतीकरितां, आणि काही अंशी त्या काळच्या ग्रंथकारांचा परिचय करून घेण्याकरितां व साधल्यास आपल्या 'संभाषण' नामक पुस्तकाच्या प्रसिद्धीकरितां बार्क्लेने इंग्लंडमध्ये लंडनला जावयाचे ठरविले. त्याकरितां आपल्या ट्रिनिटी कॉलेजांतून त्याने रजा घेतली. तो इंग्लंडला आल्यावर त्याची लंडनमधल्या विद्वद्रत्नाशी ओळख करून देण्याची खटपट बार्क्लेचा देशबंध 'गलिव्हरच्या वृत्तांता'चा प्रसिद्ध कर्ता स्विफ्ट, व प्रसिद्ध ग्रंथकार स्टील यांनी केली. दोघांचेंहि बार्क्लेच्या प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांवरून चांगले मत झालेले होते. त्यांनी आपल्या देशांतील या होतकरू तत्त्वज्ञान्याची राजदरबारीहि ओळख करून दिली. स्टीलच्या 'गार्डियन' या पत्रांत बार्क्ले निबंध लिहूं लागला. प्रत्येक निबंधाबद्दल त्याला एक गिनी मिळत असे. आपल्या मित्राच्या साहाय्याने बार्क्लेने ट्रिनिटी कॉलेजांत असतांना लिहिलेला तत्त्वज्ञानात्मक संभाषणाचा ग्रंथ लंडनमध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाने त्याची सर्वत्र वाहवा होऊन त्याच्या मताचा झपाट्याने प्रसार झाला. त्याच्या मताला पुष्कळ अनुयायी मिळाले, व त्याची यूरोपांतील प्रमुख तत्त्वज्ञान्यांत गणना होऊ लागली.

 बार्क्लेच्या या कीर्तीमुळे त्याला सरकरादरबारांत मान मिळू लागला व युरोपांत प्रवास करण्याची त्याला संधि आली. लॉर्ड पिटरबरो या वजनदार सरदाराची सिसिलीच्या राजाकडे वकील म्हणून नेमणूक झाली व त्याने बार्क्लेला आपला चिटणीस म्हणून बरोबर नेण्याचे ठरविले.

 बार्क्लेच्या आयुष्यांतील ही प्रवासाची वर्षे त्याला फार आनंदांत गेलों