पान:तीन तत्वज्ञानी.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

व या त्याच्या प्रवासामुळे त्याला ग्रीक तत्वज्ञानाचा विशेष नाद लागून त्याच्या पुढील तात्विक मतांवर प्लेटो या ग्रंथकर्त्याच्या लेखांचा फारच परिणाम झाला. फ्रान्स, इटली व ग्रीस या देशांमधल्या मोठमोठ्या शहरांत बार्क्लेला महिनेच्या महिने राहण्याला सांपडले व त्याने आपल्या या निवासाचा पूर्ण फायदा करून घेतला. आपल्या प्रवासाची व त्या प्रवासांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर वर्णने बार्क्ले इंग्लंडांतील आपल्या स्नेह्यांना पाठवीत असे. हा सर्व पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला आहे व त्यावरून बार्क्लेची सूक्ष्म अवलोकनशक्ति, त्याचा मार्मिकपणा, त्याची सदभिरुचि, व पाहिलेल्या गोष्टींचे हुबेहूब वर्णन करण्याची त्याची शैली ही उत्तम तऱ्हेने दिसून येतात.

 सुमारे वर्षदीड वर्ष युरोपांत काढल्यावर अन राणीच्या मृत्यूमुळे मंत्रिमंडळांत फरक झाला, व लॉर्ड पिटरबरोंना परत यावे लागले. त्यामुळे बार्क्लेलाही लंडनला परतावे लागले. त्यामुळे बार्क्लेची प्रवासाची हौस पूर्ण झाली नव्हती. स्विफ्टच्या वजनाने बार्क्लेला एका श्रीमंत मुलाच्या खाजगी शिक्षकाची जागा मिळून तो पुनः इंग्लंडांतून युरोपांत गेला. या वेळी त्याला चार वर्षे युरोपात घालवितां आली. अर्थात् आयलैंड सोडून त्याला एकंदर सात वर्षे झाली.

 १७२० च्या सुमाराला बार्क्ले इंग्लंडांत परत आला. तों इंग्लंडमध्ये 'साउथ सी बबल' या नांवाने इंग्लंडच्या इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या व्यापारी कंपनीचा बोजवारा होऊन लोकांची फार दैना झाली होती. बार्क्लेनें या बाबतींत एक निबंध प्रसिद्ध करून त्यांत त्याने लोकांच्या दोषांचे आविष्करण केले व हे दोष नाहीसे झाल्याखेरजि देशाचा तरणोपाय नाही असे प्रतिपादन केले. पण या प्रसंगाने निवळ तात्विक व वाङ्मयी विषयांपेक्षां सामाजिक सुधारणेकडे बार्क्लेचे जास्त लक्ष्य वेधले व कांहीं तरी लोककल्याणाचे प्रत्यक्ष काम आपण हाती घ्यावे, असा विचार त्याच्या मनांत घोळू लागला.

 देशी परत आल्यावर बाळूला आयुष्यक्रम कायम करण्याची संधि

६२