पान:तीन तत्वज्ञानी.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

याचीहि दीक्षा घेतली होती; पण तो कित्येक उपाध्यायांप्रमाणे आग्रही धर्माभिमानी कधींहि झाला नाही, व त्याची सत्याची आवड आमरणांत कायम राहिली.

 बार्क्लेच्या टिपणवहीवरून त्याच्या मनांत घोळणाऱ्या विषयांची चांगली कल्पना येते. पण ही मनांतली खळबळ आंतच न जिरतां ती लेखनद्वारा प्रगट झाली. बार्क्लेने पहिले दोन लहान लहान निबंध १७०७ च्या आधींच लिहिले, व प्रसिद्ध केले. हे दोन्ही निबंध गणितासंबंधीच्या काही प्रश्नांबद्दल होते, व ते लॅटिन भाषेमध्ये लिहिले होते. पण ज्या दोन ग्रंथांच्या योगाने बार्क्लेने तत्त्वज्ञान्यांच्या मालिकेत एकदम वरची जागा पटकाविली, ते दोन ग्रंथ त्याने या लहान निबंधांनंतर दोनतीन वर्षांतच लिहिले. दृष्टीची नवी उपपत्ति हा बार्क्लेचा पहिला तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ होय. हा त्याने १७०९ या साली प्रसिद्ध केला. या निबंधांत बार्क्लेनें मनुष्याच्या अवलोकनशक्तीची मीमांसा करून असे ठरविले की, वस्तूचा आकार व अंतर ही आपल्या दृष्टीला दिसतात असे आपण म्हणतों खरें, पण वास्तविक ती आपल्याला दिसत नाहीत. कारण, दृष्टीचा खरा विषय म्हणजे रंग होय. वस्तूच्या अंधुक किंवा स्पष्ट रंगचित्रावरून आपण वस्तूचे अंतर व आकार यांचा केवळ अंदाज करतो. अंतर व आकार हे पदार्थाचे गुण स्पर्शगम्य आहेत, ते दृष्टिगम्य नाहीत, असे बार्क्लेने प्रतिपादन केले. या निबंधाचा तत्त्वज्ञानविषयक मथितार्थ असा होता की, जडसृष्टीचे जे ज्ञान आपणाला होते, ते सर्व मानसिक संवेदनांच्या योगाने होते.

 याच्या पुढचा ग्रंथ बार्क्लेने दुसऱ्याच वर्षी म्हणजे १७१० मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथांत त्याने आपले नवें मत जगापुढे ठेविलें. जड व चित् अशी स्वतंत्र तत्त्वे मानणाऱ्या तत्त्वज्ञानाचे बार्क्लेने या ग्रंथांत खंडन केले आहे. त्याचे म्हणणे सर्व जग हे चिन्मयच आहे. ज्याला सामान्य माणसें जडद्रव्य म्हणतात, ते संवेदनांचा समुदाय होय. आमरणान्त याच मताचें बार्क्लेने निरनिराळ्या ग्रंथांत उद्धाटन केले आहे. या मताने जगांतील नास्तिक्य नाहीसे होईल, असें बार्क्लेला वाटत असे. कारण सर्व

६०