पान:तीन तत्वज्ञानी.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले


पुढे मेहुणा झाला ) या नांवाचा त्याचा सोबती असे दोघेजण एकदा फाशीची शिक्षा अमलांत येत असतां ती पाहण्याला गेले. बार्क्ले तेथून परत आला, तो उदास अशा मनःस्थितीत आला; पण फांसावर चढविला जात असतांना त्या गुन्हेगाराला काय संवेदना होत असतील, याबद्दल बार्क्लेचा सारखा विचार चालला होता. आपल्या या विलक्षण जिज्ञासेबद्दल बार्क्लेने कॅटिरिनीजवळ गोष्ट काढली, व दोघां मित्रांचे असें ठरले की, फांशी जातांना काय वाटते, याबद्दल प्रथम बार्क्लेने प्रयोग करून पहावा, आणि मग कॅटिरिनीने तोच प्रयोग आपल्यावर करावा. मी खूण केली की मला फासावरून सोडवा असें बार्क्लेने सांगितले होते. ठरल्याप्रमाणे वरच्या तक्तपोशीला दोरखंड बांधून बार्क्लेने आपल्या मानेला त्याचा शेवट बांधला, व खालची खुर्ची कटिीरनीला काढून घेण्याला सांगितले. खुर्ची काढून घेतांक्षणींच बार्क्लेला बेशुद्धी येऊन ठरलेली खूण करण्याचे सामर्थ्य राहिले नाही. पण खुणेची अधिक वाट न पाहतां त्याच्या मित्राने त्याला फांसावरून सोडविले; नाही तर बार्क्ले खराखुराच फांशी जाण्याची पाळी आली होती! दोरी सोडल्यावर बार्क्ले भूमीवर निश्चेष्ट पडला, काही वेळाने सावध झाल्यावर बाक्लै एकदम म्हणाला " वाहवारे कँटिरिनी ! माझा गळपटा तूं चुरडलास !"

 बार्क्लेच्या प्रयोगानंतर अर्थातच कँटिरिनीला त्याप्रमाणे स्वतःवर प्रयोग करून घेण्याची इच्छा झाली नाही! या गोष्टीवरून बार्क्लेचा धाडशी स्वभाव, त्याची ज्ञान मिळविण्याची हौस आणि विशेषतः त्याचा आध्यात्मिक ज्ञानाकडे ओढा, ही चांगली दिसून येतात.

 बार्क्लेचा ट्रिनिटी कॉलेजांतील शिक्षणक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला. त्याला १७०२ मध्ये शिष्यवृत्ति मिळाली.१७०४ मध्ये तो बी.ए.ची परीक्षा पास झाला, व १७०७ मध्ये त्याने एम्. ए.ची पदवी मिळविली. या परीक्षेत त्याने असामान्य विद्वत्ता दाखविली, म्हणून त्याला युनिव्हर्सिटी फेलोशिप देण्यांत आली. १७०७ पासून १७१२ अखेर बार्क्ले ट्रिनिटी कॉलेजांत शिक्षकाचे काम करीत होता. १७०९ मध्ये त्याने उपाध्या

५९