पान:तीन तत्वज्ञानी.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

वर्गाकडे येतो. त्यांतल्यात्यांत ज्यांचे काम विद्यादान करण्याचे आहे, त्यांच्याकडे तर हा पुढारीपणा प्रामुख्यानेच येतो. पूर्वीच्या काळी हे काम ब्राह्मणवर्णाचे होते, व त्याकाळचे ब्राह्मण अध्ययन व अध्यापन यांमध्येच आपला सर्व वेळ खर्च करीत असत. परंतु, अशा प्रकारची उच्व कर्तव्यजागृति या शिक्षकवर्गामध्येसुद्धां कमीच दिसते. आधी या धंद्यांत पडणारे सुशिक्षित धंद्याच्या आवडीखातर यामध्ये पडणारे फार थोडे. दुसऱ्या जास्त किफायतीच्या धंद्यांत आपली सोय लागत नाही, असे दिसून आल्यावर निरुपाय म्हणून या शिक्षकाच्या धंद्यांत पडणारे फार, जी विद्या आपण शिकवितो, तिच्याबद्दल योग्य अभिमान वाटणारे, विद्यावद्धि हाच देशाच्या तरणोपायाचा खरा मार्ग आहे, व अशी जीवंत आणि जागरूक जाणीव असलेले, या विद्यार्जनांत व विद्यादानांत आपले सर्व सामर्थ्य खर्च करणारे शिक्षक दुर्लभ. भाड्याच्या तट्टाप्रमाणे कसें बसें ओझे वाहणारेच फार ! ज्यांना आपण शिकवितों त्या विद्येबद्दल अभिमान वाटत नाही, ज्यांना जनसमूहांत विद्येच्या प्रसाराचा केवढा फायदा आहे याची जाणीव नाही, ज्यांना विद्येची खरी गोडी नाही, जे विद्यादेवीचे निस्सीम भक्त नाहीत, त्यांच्या हातून विद्यादानाचे काम कितीसें चोख होणार! म्हणूनच या वर्गातहि कामचुकार लोक फार आहेत. शिक्षकाचा धंदा हे लोक उपजीविकेचे साधन म्हणून करतात. यामुळेच या वर्गाकडून शिक्षण प्रसाराच्या बाबतीत जितकी जोराची खटपट व्हावयाला पाहिजे तशी होत नाही.

 सारांश, माझ्या ग्रीसदेशांतील माझ्या बांधवांमध्ये जे दोष मी पाहिले व जे घालविण्याचा मी आजन्म प्रयत्न केला, त्या प्रकारचे दोष या देशांतहि दिसत आहेत. तरी आपण आतां या देशांत जन्माला येऊन येथल्या लोकांचे कान उघडून त्यांच्यामध्ये कर्तव्यजागृति व डोळसश्रद्धा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करूं या, म्हणजे माझ्या मनाला जास्तच आनंद होईल."

५६