पान:तीन तत्वज्ञानी.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

 " एकदां मनुष्य रोगग्रस्त झाला, म्हणजे त्याची प्रकृति फार नाजुक होऊन ती तोळेवजा झालेली असते, व यापुढे बारीकसारीक बाह्य परिस्थितिभेदाने लक्षणांत कमीजास्तपणा होतो, सायंकाळी सूर्य अस्ताली जात असतांना क्षितिजाच्या रंगांत क्षणोक्षणी नवीन बदल होत असतोआतां तांबडा, तर आतां सोनेरी; आतां पिवळा तर आतां निळा; अशा किती तरी छटा क्षितिजावर येतात-पण, त्यामुळे सूर्यास्ताच्या मुख्य गोष्टींत फरक होत नसतो, त्याचप्रमाणे रोगग्रस्त माणसाची गोष्ट असते, व म्हणून रोगाचे निदान केल्यावर त्या रोगाच्या प्रतिकारार्थ अनुभवाने ठरलेली औषधयोजना केली पाहिजे, व क्षणोक्षणी जरी लक्षणे बदलली, तरी लहान मुलांच्या खेळांतील 'पातळ झाले पीठ घाल, घट्ट झाले दूध घाल,' असा प्रकार शास्त्रीय पद्धतीने जाणाऱ्या डॉक्टरांनी करतां कामा नये, हे डॉक्टरचे खरें कर्तव्यकर्म आहे. परंतु काही डॉक्टरांची प्रवृत्ति याच्या उलट असते. आपल्या रोग्यांना खूष करणे एवढाच अशा त्यांच्या साऱ्या खटपटीचा उद्देश असतो, परंतु ही प्रवृत्ति दुखणे वाढण्यास निदान दिनावधीवर नेण्यास कारणीभूत होते, हे या डॉक्टर लोकांच्या ध्यानात येत नाही किंवा आले तरी आपली तुमडी भरण्याकरतां ते त्याची फिकीर करीत नाहीत.

 " यानंतरचा सुशिक्षितांचा वर्ग किंवा जात म्हणजे वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें वगैरेंचे संपादक व निवळ लेखनाच्या धंद्यावर उपजीविका करणारा वर्ग. हिंदुस्तानांत हाहि वर्ग एका दृष्टीने वकिलाप्रमाणेच नवा आहे. पूर्वकाळी लेखक नव्हते, असे नाही. पूर्वीच्या लेखकांनी संस्कृत, पाली व इतर निरनिराळ्या प्राकृत भाषांमध्ये अवाढव्य वाङ्मय करून ठेविले आहे. आज जर हिंदुस्तानची कीर्ति सर्व जगभर पसरली असली, तर ती त्या देशांतील संस्कृतभाषेतील अनुपम वाङ्मयामुळेच होय. परंतु, पूर्वकाळी विद्याव्यासंगी लोक आपापल्या आवडीच्या विषयावर निरनिराळे ग्रंथ लिहीत असत. ते ग्रंथ लिहिण्यांत उपजीविका करण्याचा हेतु नसे, व पूर्वकाळी हल्लीसारखी छापण्याची कला माहिती नसल्या

५४