पान:तीन तत्वज्ञानी.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

हिंदुस्थानांत जे एंजिनीयर आहेत, ते बहुतेक सरकारी नोकर आहेत. व त्यांच्यामध्ये सरकारी नोकरांचे दोष आहेत. शिवाय आपल्या धंद्याचे पूर्ण ज्ञान मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेचाहि त्यांच्यांत अभाव आहे. डॉक्टरांच्या धंद्यांत बरेच लोक खाजगी धंदा करणारे आहेत; परंतु येथेहि वकिलांच्यासारखीच रड आहे. स्वतःच्या धंद्याचे ज्ञान आजतागाईतचे पाहिजे, ही बुद्धि क्वचितच दिसून येते. वैद्यकशास्त्रामध्ये तरी वारंवार नवे नवे शोध लागतात. या सर्व शोघांचा फायदा आपल्या रोग्याला करून देण्याची बुद्धि या वर्गात फारशी दिसत नाही. कॉलेजांत जें कांहीं ज्ञान मिळविले असेल, त्याच ज्ञानावर काम भागविण्याची बहुतेकांची प्रवृत्ति, स्वतः प्रयोग करून वैद्यशास्त्रांत भर घालण्याचे नावच नको. पाश्चात्य व पौरस्त्य या देशांत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची बुद्धिसुद्धा कमीच आहे. काहींची दृष्टि निव्वळ पैशाची आहे. तो मिळविण्याकरितां रोग्याचे दुखणे दिरंगाईवर पडेल, असें करण्याची नीच प्रवृत्तीहि कांही डॉक्टरांमध्ये दिसून येते. काही डॉक्टर स्वतःची बुद्धि व विचारशक्ति यांचा बिलकुल उपयोग न करितां नवीन व्यापारी कंपन्यांचा दिखाऊ औषधी माल खपविणारे एजंटच बनतात. यांना रोग्यांना नवीं नवीं पेटंट औषधे व कृत्रिम अन्ने देण्याचीच खोड लागलेली असते. आपले खरें कर्तव्यकर्म म्हणजे आजारी माणसाला आराम पाडून रोगबीज नाहीसे करणे होय, हे हे लोक विसरतात. रोग्याला पाहिले न पाहिले. तो एकादा औषधाचा पाठ लिहून आठ आणे रोग्याकडे लागू करण्याची प्रवृत्तिच जास्त लोकांत दिसून येते. बरोबर रोगचिकित्सा करून, मग पूर्ण विचार करून एकादी योग्य औषधयोजना करण्याच्या ऐवजी कांहीं डॉक्टरांना वरवरच्या लक्षणावर तात्पुरती योजना करण्याची खोड दिसते. आज जरा पोट दुखले, घाला एक औषध जास्त; आज पोटदुखी बंद आहे, पण कपाळच दुखले, काढ एक औषध व दे एक पूड घालून ! आज काय तिसरेंच लक्षण झालें, कर त्याची तजवीज असा प्रकार पुष्कळ डॉक्टरांचा असतो.

५३