पान:तीन तत्वज्ञानी.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

चाललेल्या आपल्या ज्ञानपुंजीवर वेळ मारून नेणारे, मोठ्या पुस्तकांतून कायद्याचा आधार काढावयाचा असेल, तर फी जास्त पडेल, अशा प्रकारची बतावणी करून जास्त फी उकळण्यापुरता कायद्याच्या पुस्तकांचा उपयोग करणारे वकील फार. पण बांधलेली शिदोरी किती दिवस पुरणार ? या रीतीने अशा वकीलांची फारशी चलती चालत नाहीं. या वकिलांपैकी काहींना पैशापलीकडे काहीच दिसत नाही. कशा तरी तऱ्हेने लोकांमध्ये कलागती लावून आपण जास्त जास्त पैसा कसा उकळावा, याकडेच त्यांची दृष्टि असते. तसेच आपल्या स्वार्थाकरतां न्यायाधीशाची व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या इतर सरकारी अधिकाऱ्यांची खुशामत करून कांहीं वकील लोक आपल्याला सरकारी नोकरांच्याही खालच्या दर्ज्याला पोहोचवून घेतात. सारांश, सुशिक्षितांच्या या एका मोठ्या वर्गाची सामान्य स्थिति शोचनीयच आहे. वास्तविक सर्व घंद्यांमध्ये वकिलीसारखा स्वतंत्र धंदा नाही. या वर्गाचे लोक सामान्य जनसमूहाचे स्वाभाविक लोकनायक असतात व तशा स्वतंत्र बाप्याने राहण्यासारखा त्यांचा दर्जा असतो. एका दृष्टीने लोकांना चांगले वळण लावण्याचे त्यांचे काम असते. परंतु या वर्गाला ही खऱ्या कर्तव्याची ओळख झालेली नाही व म्हणून त्यांच्यामध्ये अज्ञान व आपस्वार्थीपणा भरलेला आहे. असो.

 " सुशिक्षितांचा तिसरा वर्ग म्हणजे डॉक्टर व एंजिनीयर या धंदेवाल्यांचा होय. यांपैकी स्वतंत्रपणाने एंजिनीयरचा धंदा करणारे हिंदुस्थानांत क्वचितच दृष्टीला पडतात. कारण घरे बांधतांना नकाशा काढून, हवा, उजेड व इतर आयुर्वर्धक गोष्टींची घरांत सोय करणे जरूर आहे, अशी जाणीवच लोकांमध्ये झालेली नाही. 'पिच्छेसे आई' या म्हणीप्रमाणे हिंदुस्थानांतील घरे बांधण्याची पद्धति आहे. नवीन सुखसोईची, आयुरारोग्याच्या साधनांची कल्पनाच नाही. यामुळे घरे बांधतांना या गोष्टींचा विचार करावा, असे लोकांना वाटत नाही व म्हणून शास्त्रीय पद्धतीने घरे बांधणाऱ्या एंजिनीयरांचीही लोकांना गरज नाही. हल्ली

५२