पान:तीन तत्वज्ञानी.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

निकाल दिला म्हणजे झाले असा प्रकार असे. राजाच्या न्यायकचेरीत गेले तरी न्यायाधीशच स्वतः वादीप्रतिवादींचे म्हणणे व त्यांचा साक्षीपुरावा पाहून निकाल देई. परंतु इंग्रजी कायदा सुधारलेला. त्या कायद्याचा शब्दावर भर. असा कायदा साध्याभोळ्या लोकांना कसा कळावा? तेव्हा कायदा जाणणाऱ्या मध्यस्थांची जरूरी उत्पन्न झाली. कारण स्वतः वादीप्रतिवादींना कायद्याच्या कलमांची गुंतागुंत काय कळणार ? तेव्हां न्यायकोटा पुढे वकिलांच्या मुखानेच जाणे प्राप्त. याप्रमाणे ही जात एका विशिष्ट परिस्थितीमुळे उत्पन्न झाली. आता या नव्या जातीचे कर्तव्य उघड आहे. अशिक्षित व अडाणी वादीप्रतिवादींना कायद्याच्या कलमाबद्दल व त्यांच्या अर्थाबद्दल योग्य सल्ला देऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याची खटपट करणे हे त्यांचे कर्तव्यकर्म. म्हणजे परकी, पण सुधारलेले सरकार व अडाणी अशिक्षित लोकसमुदाय यांमधले दुभाषीच वकील होत. अर्थात् केवळ कायद्याचे खरे हेतु लोकांना समजावून देणे, तसेंच कायद्यानेच दिलेल्या लोकांच्या हक्कांचे रक्षण करणे व त्या हक्कांची पायमल्ली होत असल्यास तिचा प्रतिकार करणे, या गोष्टींचा यांत समावेश होतो व हे कर्तव्यकर्म उत्तम प्रकारे बजावतां यावे, म्हणून प्रथमतः या वकील वर्गाने कायद्यांचे, कायदेशास्त्रांचे आणि राजनीतिशास्त्राचे उत्तम अध्ययन केले पाहिजे. शिवाय कायदा हा नेहमी वाढता विषय आहे. त्यासंबंधी नव्यानव्या कल्पना, नवे नवे ठराव व रूळी नेहमी बाहेर येत असतात. या सर्व गोष्टींचे यथासांग ज्ञान वकिलाला पाहिजे. सारांश, वकिलाने आजन्म विद्यार्थी राहिले पाहिजे. त्याच्या विद्याव्यासंगाला खळ पडता कामा नये. तसेंच तंटे वाढविणे, लोकांना खोटीच सल्ला देऊन त्यांना भांडणांना उत्तेजन देणे, सारांश, कजेदलालाच्या प्रवृत्तीला योग्य वळण लावून खऱ्याखोट्याच्या निर्णयाला मदत करणे हे वकीलाचे खरे कर्तव्यकर्म आहे. परंतु अशी कर्तव्याची खरी जाणीव असलेले वकील या वर्गात फारसे दिसत नाहीत. एकदां परीक्षा पास झाली म्हणजे पुस्तकांना रामराम ठोकणारे व दरवर्षी जुनाट बनत

५१