पान:तीन तत्वज्ञानी.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

सारख्या मनोवृति असलेल्या ईश्वराच्या लेकरांना अस्पृश्य समजावें, त्यांच्या वाऱ्यालाहि उभे राहूं नये, व या अस्पृश्य जातीच्या माणसांच्या स्वतःच्या मनाची इतकी अवनति व्हावी, की, अशा वागणुकीचा त्यांना त्वेष येऊ नये; आपल्यांतील मनुष्यांश व पर्यायाने ईश्वरांश यांची पूर्ण विस्मृति व्हावी, हे केवढे अगाध अज्ञान व त्याचाच परिणाम ही केवढी अंधश्रद्धा ! माझ्या ग्रीसदेशांत मी आपल्या लोकांचे दोन दोष पाहिले होते. एक अंधश्रद्धा व दुसरी कर्तव्यशून्यता. हे दोन्हीहि दोष एकाच अज्ञानरूप कारणाने उत्पन्न होतात, व म्हणून मी आजन्म सत्यज्ञानाचा प्रसार करण्याकरितां खटपट केली. या समाजांतहि हे दोष दिसून येत आहेत, परंतु सुधारलेल्या राज्यपद्धतीने येथे ज्ञानाचा प्रसार कांहीं कांहीं लोकांत होऊ लागला आहे. तरी आतां या सुशिक्षित वर्गाच्या मन:स्थितीचे निरीक्षण करू या.

 " या सुशिक्षित वर्गामध्ये धंद्याप्रमाणे निरनिराळे वर्ग झालेले आहेत. याच श्रमविभागाच्या तत्त्वावर व जितजेते या संबंधापासून या एकजीव आर्यलोकांमध्थें प्रथमतः वर्णभेद उत्पन्न झाला. परंतु, जोपर्यंत हे वर्गीकरण श्रमविभागावरच होते, तोपर्यंत त्यांमध्ये पुष्कळ लवचिकपणा होता. परंतु पुढे पुढे हे वर्गीकरण जन्मावरून ठरूं लागले, व वर्ण परमेश्वरानेच निर्माण केले आहेत, अशी समजूत फैलावली आणि तेव्हापासून जातिभेद जोराने सुरू झाला, व त्याला तीव्रस्वरूप प्राप्त झाले. हल्ली या समाजांत हजारों जाति झाल्या आहेत, व सुशिक्षित लोकहि अंधश्रद्धेनें या चालीला चिकटून राहिले आहेत, ही केवढी शोचनीय गोष्ट आहे ! पण हल्ली धंद्यामुळे नवे झालेले वर्ग किंवा जाति-हिंदुलोकांना परिचित असा शब्द वापरल्याने त्यांची होणारी चूक त्यांच्या ध्यानात येईल, म्हणून तोच शब्द वापरूं या-इंग्रजी शिकणाऱ्या लोकांमध्यहि दिसून येत आहेत.

 पहिली मोठी जात सरकारी नोकरांची. यांत लहान मोठ्या सर्व दर्जाच्या नोकरांचा समावेश होतो. हिंदुलोकांच्या पूर्वीच्या सम

४८