पान:तीन तत्वज्ञानी.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

पण आपल्याशीच बोलत आहे, असे मला दिसलें; म्हणून मी तिकडे वळलों, तो ती आकृति मी वाचलेल्या साक्रेटिसाच्या वर्णनाशी हुबेहुब जुळली. हे पाहतांच माझा आनंद गगनात मावेना. कारण, माझी काळजी दूर झाली, असे मला वाटले, व मी भराभर त्या आकृतीच्या तोंडून निघालेले उद्गार टिपून घेऊ लागलो. इतके मला स्वप्न पडले, सकाळी उठून पाहतो, तो माझ्या टेबलावर एक वही पडलेली. ती उघडून पाहतांच तींत तें साक्रेटिसाचे आत्मगत भाषण लिहून ठेवलेलें दिसले, तरी आतां अधिक प्रस्तावना, किंवा हे कसें झालें, याची चर्चा न करितां या भाषणाचा समग्र उतारा फलश्रुतीदाखल देतो.

" केवढा प्रचंड समाज हा ! माझ्या प्रिय देशबांधवांच्या आर्यशाखेंतीलच हे हिंदुलोक आहेत. पण हा एवढा मोठा हिंदुसमाज अगदी सामसूम कां बरें दिसत आहे ? अरेरे ! या तीस कोटि लोकांपैकी शेकडा नव्वद लोक पूर्ण अज्ञानी आहेत. ज्ञान हे तर मानवप्राण्याचे खरे जीवन आहे; तेच जर या इतक्या लोकांत नाही, तर यांच्यामध्ये जागृति कशी दिसावी व येथे हालचाल तरी कशी दृग्गोचर व्हावी ? माझ्या प्रिय ग्रीसदेशांत पुष्कळ गुलाम होते. येथे गुलाम नाहीत खरे, तरी पण येथे सात कोटि अस्पृश्य लोकांचा वर्ग आहे. या लोकांची काय ही हीन स्थिति ! आमच्या वेळचे गुलाम घरांतली सर्व कामें करीत. त्यांना आम्ही शेताची कामे सांगत असू. गुलाम आमच्या मुलांबाळांचे संगोपन करीत असत. ते आमच्यांत मिळतमिसळत असत. त्यांना फक्त राजकीय हक्क नव्हते. पण येथल्या अस्पृश्य जातीची स्थिति गुलामापेक्षांहि वाईट दिसते. अरेरे ! यांना वरच्या जाति पशूपेक्षांहि कमी लेखतात. कारण, ते या वर्गाची सावलीसुद्धां अपवित्र मानतात. हरहर ! ज्या देशांतील तत्त्वज्ञांनी 'वसुधैव कुटुंबकम् ' किंवा 'सर्वांभूती परमेश्वर' अशासारखी उदात्त तत्त्वे प्रतिपादन केली, त्याच देशांतील वरिष्ठ जातींनी सांप्रत आपल्याच सारख्या चालत्या बोलत्या आपल्याचसारख्या बुद्धिवान् आपल्याचसारख्या विचारवंत व आपल्याच

४७