पान:तीन तत्वज्ञानी.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

दुःख आवरेना; सर्वांना ओक्साबोक्शी रडू कोसळले. सॉक्रेटिसाकरितां ती मंडळी रडत नव्हती, तर आपला इतका उत्तम मित्र नाहीसा झाला याबद्दल ती रडत होती. क्रिटोला तर आपले अश्रु न आवरल्यामुळे तो बाहेर गेला होता, व त्या सर्व दिवसभर ज्याच्या रडण्याला खळ पडला नव्हता, तो अपॉलोडोरसहि मोठमोठ्याने रडू लागला, व त्याच्या हुंदक्यांनी आणि विलापांनी सर्वांच्या काळजाचे पाणी झाले. मात्र सॉक्रेटिस अगदी शांत होता. तो सर्वांना म्हणाला, "मित्रहो, तुम्ही हे काय मांडिले आहे ? अशा तऱ्हेचे प्रदर्शन होऊ नये, म्हणून मी बायकांमुलानां मुद्दाम पाठवून दिले. कारण मी असे ऐकिले आहे की, मनुष्याला शांततेने मरण यावे, म्हणून तुम्ही शांत व्हा व धीर धरा."

 हे सॉक्रेटिसाचे भाषण ऐकून सर्व मंडळी लाजली, व त्यांनी आपला शोक आवरला. इकडे सॉक्रेटिस येरझारा घालीत होता; इतक्यांत आपले पाय जड होत आहेत, असे त्याला भासले, व मग त्याला सांगितल्याप्रमाणे तो उताणा निजला. नंतर विष देणारा माणूस राहून राहून त्याचे हातपाय तपासू लागला, व पायांला जोराने दाबून येथे संवेदना होतात का म्हणून विचारूं लागला. सॉक्रेटिस म्हणाला, "नाही होत." नंतर त्याने त्याच्या तंगड्या त्याच प्रमाणे दाबल्या, व सॉक्रेटिसाचे शरीर गार व ताठ होत चालले आहे हे सर्वांना दाखविलें, सॉक्रेटिसानेंहि ते पाहिले व " हृदयापर्यंत पोहोचले, म्हणजे मी जाईन," असे म्हटले. त्याच्या कमरेपर्यंत गारवा आला, तेव्हां साक्रेटिसाने आपल्या चेहऱ्यावरील आवरण काढून टाकलें, व पुढील शब्द उच्चारले. ते त्याचे शेवटचेच होते.

 "क्रिटो, अस्क्लेयस देवाला मी एक कोंबडे द्यावयाचे राहिले आहे ते द्यायला तूं विसरूं नकोस."

 क्रिटो म्हणाला, " मी खात्रीने देईन. आपली आणखी काही इच्छा आहे काय ?".

 या प्रश्नाला सॉक्रेटिसाने उत्तर दिले नाही. पण थोड्याच वेळाने

४४