पान:तीन तत्वज्ञानी.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

 थोड्याच वेळांत सरकारी माणूस येऊन सॉक्रेटिसला म्हणाला, " सॉक्रेटिस, इतर माणसांप्रमाणे तुम्ही असमंजसपणाने वागणार नाही, हें मला ठाऊक आहे. सरकारी हुकमाप्रमाणे विष प्यायला मी त्यांना सांगितले, की ते माझ्यावर रागावतात व मला शिव्याशाप देतात. परंतु आजपर्यंत जे जे लोक तुरुंगांत आलेले आहेत, त्या सर्वांत तुमच्यासारखा उदार, शांत व उत्कृष्ट मनुष्य मला तर आढळला नाहीं ! आणि आतां माझी खात्री आहे, की तुम्ही माझ्यावर रागावणार नाही, तर ज्यांच्या शिरावर आपल्या मृत्यूचे खापर फुटले आहे, त्यांच्यावर रागवाल, ज्याला उपाय नाही ती गोष्ट आपण शांतपणे सोसण्याचा प्रयत्न करा. मी कां आलो आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच, आतां मी आपला निरोप घेतो."

 सॉक्रेटिसाने त्या माणसाकडे पाहून त्याला म्हटले, "ठीक आहे, तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे वागण्यास मी तयार आहे."

 नंतर मित्रमंडळीकडे वळून तो म्हणाला, “ हा मनुष्य किती सभ्य आहे ! माझ्या सर्व तुरुंगवासांत हा मनुष्य मजकडे नेहमी येत असे. हा केव्हां केव्हां माझ्याजवळ बोले व माझ्याशी फार चांगल्या तऱ्हेनें वागे. आता माझ्याकरता त्याला किती दुःख होत आहे ? किटो, चला तर आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करूं या, विष तयार झाले असले तर आणवा व जर ते तयार झाले नसले तर तयार करवा."

 क्रिटो म्हणाला, " नाही. सॉक्रेटिस, अजून सूर्य टेकड्यांवरच आहे. तो मावळला नाही. शिवाय मला ठाऊक आहे की, इतर माणसें अगर्दी उशीरां विष प्राशन करतात व विष घेण्याबद्दल इशारा झाल्यावर सुद्धां हौसेने खातात, पितात व आपल्या निवडक मित्रांचे सहवाससुख भोगतात, तेव्हां घाई करण्याचे कारण नाही. अजून वेळ आहे."

 सॉक्रेटिस म्हणाला, "क्रिटो, ज्यांच्याबद्दल तूं बोलत आहेस ते साहजिकच तसे करतात, कारण असे करण्यापासून आपला फायदा आहे असे त्यांना वाटते. पण मी मात्र तसे करणार नाही. कां की थोड्या उशीराने विष पिण्यापासून मला काही एक मिळणार नाही. उलट जे

४२