पान:तीन तत्वज्ञानी.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

च्या मनावर उपड्या घागरीवर पाण्यासारखी झाली ! तरी तो ज्याप्रमाणे चौकशीच्या वेळी मला जामीन राहिला होता, त्याप्रमाणे आतां तुम्ही मला निराळ्या तऱ्हेनें जामीन रहा. तेव्हां मी येथून जाणार नाही, हजर राहीन, अशाबद्दल त्याने हमी घेतली होती, परंतु आतां माझ्या मरणानंतर मी तुमच्याबरोबर राहणार नाही, तर येथून जाईन, अशाबद्दल तुम्ही हमी घ्या. असे तुम्ही केले म्हणजे माझ्या मरणाबद्दल त्याला कमी दुःख होईल, व जेव्हां माझें शरीर जळतांना किंवा पुरतांना तो पाहील, तेव्हां मला भयंकर यातना होत आहेत, असे त्याला वाटणार नाही. तसेच माझ्या स्मशानाविधीच्या वेळी सॉक्रेटिसाला कपडे चढवून नीट बसवीत आहों, किंवा सॉक्रेटिसाला जाळीत किंवा पुरीत आहों, असें तो म्हणणार नाही. कारण प्रिय क्रिटो ! तुम्ही हे ध्यानात ठेवा की, अयथार्थ शब्दप्रयोग करणे हा मूळ दोष आहे इतकेच नव्हे तर त्याच्या योगाने आत्म्यालाही दोष लागतो. म्हणून तुम्ही आनंदी राहून माझें शरीर पुरावयाचे असा शब्दप्रयोग करा व तें माझें शरीर तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे व तुम्हाला योग्य दिसेल त्या तऱ्हेने पुरा."

 इतके बोलून सॉक्रेटिस उठला व स्नान करण्याकरतां दुसऱ्या खोलीत गेला. क्रिटो त्याच्या मागोमाग गेला व बाकीची मंडळी मागे राहिली. सर्वजण सॉक्रेटिसाच्या वादविषयावर बोलत होते व आपल्यावर केवढे संकट आले आहे, आज जणूं काय आपला पिताच मरत आहे व पुढील सर्व आयुष्यभर आपण पोरके होणार असे त्यांच्या मनांत येत होते.

 इतक्यांत सॉक्रेटिसाची आंघोळ आटपली आणि त्याच्या कुटुंबाची मंडळीची-त्याला दोन अगदी लहान व एक जाणता मुलगा होता-भेट झाली. क्रिटोच्या समक्षच तो बायकामुलांजवळ बोलला. व आपली शेवटली आज्ञा त्यांना सांगून त्याने त्या सर्वांना घरी लावून दिले आणि मग तो आपल्या मित्रमंडळीकडे वळला. या वेळी सूर्य अस्ताला जाऊ लागला होता. कारण तो आंतल्या खोलीत बराळ वेळ होता. स्नान होऊन मित्रमंडळींत बसल्यानंतर फारसे बोलणें निवाले नाही.

४१