पान:तीन तत्वज्ञानी.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

पळून जातां कामा नये. हे जे कारण गूढविद्या सांगते, ते बरेंच गहन असून समजण्यास सोपे नाही. तरी मला असे वाटते की, देव हे मनुष्याचे पालक आहेत, व आपण मानव हे त्यांची मालमत्ता आहो.. तुम्हाला नाही का असे वाटत ?"

 "होय, मलाही असे वाटते.”

 " तर मग तुम्ही तशा प्रकारची इच्छा प्रदार्शत केली नसतांना तुमच्या एखाद्या अंकिताने आत्महत्या केली तर तुम्हांला राग नाहीं का येणार ? आणि शक्य असल्यास तुम्ही त्याबद्दल त्याला शिक्षा नाहीं का करणार ?"

 "खात्रीने करूं."

 " तर आतां या विचारसरणीने कोणत्याही माणसाला आत्महत्या करण्याचा हक्क नाही असें नाहीं का होत ? प्रथम म्हटल्याप्रमाणे देवाकडून आग्रहाचे बोलावणे येईपर्यंत मनुष्याने वाट पाहिली पाहिजे. त्याने आत्महत्या करतां नये."

 सीब्स म्हणाला, " होय, तुमचे म्हणणे स्वाभाविक दिसते. पण तुम्ही आतांच म्हणत होतां की तत्वज्ञानी मरणाची इच्छा करील. मग देव पालनकर्ता आहे, व आपण त्याचे चाकर आहों, हे जर खरे, तर या दोन विधानांत विरोध येत नाही का ? सर्व शासनकर्त्यांमध्ये श्रेष्ठ असे देव जर शहाण्यावर देखरेख ठेवतात, तर या अंमलापासून आपली सुटका करून घेण्याची इच्छा शहाणा करील असे म्हणणे युक्तीला पटत नाही. देव जितकी त्याची काळजी घेत आहेत, त्यापेक्षा जास्त काळजी आपण स्वतंत्र झाल्यावर आपली आपण घेऊ असे त्याला खास वाटणार नाही. कदाचित् मूर्खाला असे वाटेल व आपल्या धन्यापासून पळून गेल्यास बरे, असे तो म्हणेल. इतक्या चांगल्या धन्याला आपण सोडून जाऊ नये, तर शक्य तितका काळ त्याच्याजवळच रहावे, असे त्याच्या मनांत येणार नाही, व म्हणून अविचाराच्या भरांत तो पळून जाईल, परंतु आपल्यापेक्षा सर्व तऱ्हेनें श्रेष्ठ असणाऱ्या धन्याजवळ नेहमी राहण्याची

३६