पान:तीन तत्वज्ञानी.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्रेटिस.

 सॉक्रेटिस म्हणाला, तुम्ही दोघेजणांनी फायलोलासजवळ जाऊन या गोष्टीबद्दल ऐकले नाही काय ?"

 " निश्चित असें कांही ऐकले नाही."

 "बरें, मलाही सांगोसांगीच ठाऊक आहे. तरी पण मी जे ऐकलें आहे, ते तुम्हांला सांगावयाला काय हरकत आहे ? खरोखरी जर मी परलोकाच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत आहे, तर त्या प्रवासाच्या स्वरूपाबद्दल व त्या प्रवासाबद्दल बोलणे रास्त नाही काय ? आतांची वेळ व सूर्यास्त यांमधल्या काळाचा यापेक्षा जास्त चांगला सद्व्यय आपण काय करणार?"

 " तर मग साक्रेटिस, आत्महत्या करणे वाईट असे ते कां म्हणतात? थीन्स शहरी असतांना असे करणे चांगले नाही, असें फायलोलॉस म्हणतांना मी ऐकले आहे, हे अगदी खरे आहे. दुसऱ्यांच्या तोंडूनही मी तेच ऐकले आहे, परंतु कोणाकडूनही मला निश्चयात्मक असें कांहीएक कळले नाही."

 सॉक्रेटिस म्हणाला, " तुम्ही धीर सोडतां कामा नये. कदाचित कधी काळी तुम्हांला काही तरी निश्चयात्मक कळेल. दुसऱ्या नियमांना अपवाद असतील, परंतु या नियमाला अपवाद नाही. तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, ते असे की, वाईट गोष्ट केव्हां केव्हां व कांहीं कांहीं माणसांच्या बाबतीत चांगली होते. परंतु मरणाला मात्र ही गोष्ट लागू नाही. ज्या माणसांनी मरणे बरे, त्यांनी देखील आपल्या हातांनी आपल्यावर मरण आणता कामा नये, त्यांनी त्याकरतां दुसऱ्याची वाट पहात राहिले पाहिजे."

 हंसत हंसत व आपल्या प्रांतिक भाषेत सीस म्हणाला, "खरेंच."

 सॉक्रेटिस म्हणाला, " खरेंच. अशा तऱ्हेचे विधान तुम्हांला विचित्र वाटल. तरी पण ते सयुक्तिक आहे. आणि या विधानाला एक सयुक्तिक कारणही दाखविता येईल. पण मनुष्यप्राणी हा एका प्रकारच्या तुरुंगांत आहे व तेथून त्याने आपली मुक्तता करून घेता कामा नये, अथवा तेथून

३५