पान:तीन तत्वज्ञानी.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

उच्चतम कविता आहे, अशी माझी समजूत होती. परंतु मी तुरुंगांत पडल्यानंतर हे माझं स्वप्न मला लौकिक अर्थाने काव्य करण्यास तर सांगत नाही ना असे वाढू लागले आणि म्हणून आपल्या मरणापूर्वी या लौकिक अर्थाने कविता रचून मी स्वप्नांतली आज्ञा पाळण्याचा बेत केला. तदनुरूप मी देवाची एक प्रार्थना रचली व मग मला कल्पित गोष्टी रचतां येत नाहीत, म्हणून ईसाबाच्या ज्या काही गोष्टी मला आठवत होत्या, त्यांनाच पद्याचे स्वरूप देऊन मी आपल्या मनाचे समाधान केले. तेव्हां सीन्स, तुम्ही ईव्हीनस कवीला हे सर्व निवेदन करा. व माझा त्यांना नमस्कार सांगून माझ्या पाठोपाठ येण्याबद्दल त्यांना माझ्या तर्फे विनंति करा. कारण अथीनियन लोकांच्या इच्छेप्रमाणे मी आज प्रयाण करीन असे दिसते."

 भाषण ऐकून सीमियस आश्चर्याने म्हणाला, " सॉक्रेटिस, ईव्हीनसला आपला कोण विलक्षण उपदेश हा ! मी त्याला पुष्कळ वेळां भेटलो आहे व त्यांच्याबद्दल मला जी माहिती आहे, तीवरून मला असे वाटते की शक्य असेल तेथपर्यंत ईव्हीनस आपल्या उपदेशाप्रमाणे खात्रीने वागणार नाही!"

 सॉक्रेटिसाने विचारले, "काय, ईव्हीनस हा तत्वज्ञानी नाही काय?"
 सीमीयस उत्तरला,"होय, तो आहे असे मला वाटते."

 सॉक्रेटिस म्हणाला, " तर मग ईव्हीनस मरणाची इच्छा करील व ज्याला ज्याला म्हणून तत्वज्ञानाच्या अभ्यासाची गोडी आहे, तो तो अशीच इच्छा करील. मात्र तो आत्महत्या करणार नाही. कारण असे करणे पाप आहे असे म्हणतात."

 इतके बोलून सॉक्रेटिसाने आपले पाय खाटेवरून जामनीवर ठेवले. व राहिलेल्या सर्व संभाषणाच्या वेळी तो असाच बसून होता.

 नंतर सीन्सने सॉक्रेटिसाला विचारले, " सॉक्रेटिस, आत्महत्या करणे वाईट, पण तत्वज्ञानी मरणाऱ्या माणसाच्या लागोपाठ जाण्यास इच्छा करील असे आपण म्हणतो, याचा अर्थ काय ?

३४